प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 36 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीक विमा कवच

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा (पीएएफबीवाय) अंमलबजावणीच्या 7व्या वर्षात प्रवेश

नवी दिल्ली ,१८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-प्रधानमंत्री पीक  विमा योजनेने  (पीएएफबीवाय)  आगामी खरीप 2022 हंगामासह अंमलबजावणीच्या 7 व्या वर्षात यशस्वीपणे प्रवेश केला आहे, 18 फेब्रुवारी 2016 रोजी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील सीहोर येथे योजनेचा प्रारंभ केल्याच्या घोषणेपासून तिच्या अंमलबजावणीची 6 वर्षे पूर्ण होत आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान/हानी झालेल्या  शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्‍याचे मुख्‍य उद्दिष्‍ट  भारत सरकारच्या या पथदर्शी  योजनेचे आहे.  प्रधानमंत्री पीक  विमा योजना हे  उद्दिष्ट साध्‍य करीत आहे. या योजनेअंतर्गत 4 फेब्रुवारी 2022 पर्यंत 1,07,059 कोटी रुपयांहून अधिकचे दावे निकाली काढण्यात आले. तसेच  36 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या  पीकाचा विमा उतरवण्यात आला आहे.

ही योजना राज्य/जिल्हा स्तरावरील तक्रार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी तळागाळापर्यंत मांडण्याची सुविधा देते,  यामध्ये वर्षातून दोनदा साजरा होणारा पीक विमा सप्ताह,पीएएफबीवाय पाठशाळा, समाजमाध्यम अभियान , टोल-फ्री मदतक्रमांक  आणि ईमेलद्वारे  संवाद  यांसारख्या  ‘आयईसी’ म्हणजेच माहिती,शिक्षण आणि संवाद या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारणे आणि त्यांचे निराकरण करणे देखील समाविष्ट आहे.

या योजनेत नोंदणी केलेले सुमारे 85% शेतकरी हे छोटे  आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत, ही योजना सर्वात असुरक्षित शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य  प्रदान करते.  हे नमूद करावे लागेल की, या योजनेअंतर्गत  सर्व अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांमध्ये ‘शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा पॉलिसी पोहोचवण्यासाठी ‘मेरी पॉलिसी- मेरे हाथ’  या उपक्रमाखाली पॉलिसीचे घरोघरी  वितरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. सर्व शेतक-यांना त्यांच्यासाठी असलेली धोरणे, जमिनीच्या नोंदी, दाव्याची प्रक्रिया आणि पीएएफबीवाय अंतर्गत तक्रार निवारणासंदर्भात आवश्‍यक असणारी सर्व माहिती दिली जावी त्यांना चांगल्या प्रकारे जागरूक करावे आणि सर्व माहितीने सुसज्ज बनविले जात आहे, हे सुनिश्चित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.