जलमार्ग टॅक्सी सेवेमुळे नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना जोडणारा पहिला जलमार्ग नागरिकांसाठी उपलब्ध

मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे अनुकरण संपूर्ण देशभर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे अनुकरण संपूर्ण देशभर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई- ठाणेदरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही मुंबईतून होत आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बेलापूर जेट्टी आणि बेलापूर मुंबई वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्घाटनप्रसंगी काढले.

महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत बेलापूर येथून सुरू करण्यात आलेल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आणि बेलापूर जेट्टीच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री श्री. ठाकरे, केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्गमंत्री  सर्बानंद सोनोवाल दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार,  खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, मंदा म्हात्रे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,   मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी,  ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांच्यासह  वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस महत्त्वाचा असून देशातील पहिली वॉटर टॅक्सी महाराष्ट्रात सुरु होत आहे. मुंबईतून सुरू झालेल्या सेवेचे अनुकरण देशभर केले जाते हे मुंबई ठाणे दरम्यानच्या पहिल्या रेल्वेसेवेरून दिसून आले आहे.  जलवाहतुकीच्या या सेवेचेदेखील देशात अनुकरण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग जनसेवेसाठी

छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर हुकूमत असली  पाहिजे या भावनेने त्याकाळात कल्याणमध्ये आरमाराची बांधणी सुरु केली तेव्हापासूनच या परिसराचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यानंतर इंग्रजांनी रेल्वे आणली. आपल्याकडील साधनसंपत्तीचे महत्त्व आपण किती ओळखतो आणि त्याचा जनतेला किती उपयोग करून देतो  याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जलवाहतूक सेवा सामान्य नागरिकांना फायदेशीर

विकासात दळणवळणाची सेवा महत्त्वाची भूमिका बजावते. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, भुयारी रेल्वे यामध्ये आधुनिकीकरणाची कास धरत आज वॉटर टॅक्सी सुरु झाली. नवी मुंबईला मुंबईशी आणि एलिफंटा लेण्यांना जोडणारी ही जलवाहतूक सेवा सामान्य नागरिकांना फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.

समुद्र हा केवळ पाहण्यासाठी नसून त्याचा उपयोग जलवाहतुकीसारख्या प्रकल्पांसाठी वाढला पाहिजे. येत्या दोन तीन वर्षात समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणार असून हा क्रांतिकारक टप्पा असेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई परिसरात परिवहनाचे जाळे विकसित

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील ५५ उड्डाणपूल, सागरी किनारा मार्ग, मुंबई- कोकणाला जोडणारा  सागरी मार्ग, शिवडी न्हावा शेवा मार्ग असे परिवहनाचे जाळे विकसित केले  आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, ती जगाशी हवाई मार्गाने जोडली. पण मुंबई महानगर परिसराला जोडणारी जलवाहतूक सेवा महत्वाची आहे, कामासाठी, उद्योग व्यवसायासाठी मुंबई येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला ही सेवा अधिक उपयुक्त सिद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईत पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य

नवी मुंबई विमानतळासोबतच नवी मुंबई स्पोर्टस सिटी म्हणून विकसित होत आहे हे सर्व लक्षात घेता येथे  अनेक पायाभूत सुविधांचा राज्य  शासनामार्फत विकास केला जात आहे. गुंतवणूक करतांना  उद्योजक पायाभूत सुविधांचा विचार करतात त्यादृष्टीनेही या सर्व कामांना वेगळे महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकोपयोगी कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही

लोकोपयोगी कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. जनतेच्या हिताचे काम करतांना केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला बलशाली बनवण्यासाठी एकत्र येऊन काम करूया,  त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महाराष्ट्र देईल अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून महाराष्ट्रात १३१ प्रकल्प- केंद्रीय मंत्री सोनोवाल

“देशाच्या जनतेला उत्तम सुविधा मिळाव्यात, तसेच आपल्या अर्थव्यवस्थेचा जलद विकास व्हावा, यासाठी किनारपट्टी लगतची राज्ये, बंदरे आणि सागरमाला योजनेशी संलग्न मंत्रालये यांच्या  मदतीने विविध प्रकल्प राबवत आहेत, त्याचाच भाग म्हणून मुंबईत आज ही पहिली जलमार्ग टॅक्सी सेवा सुरु झाली आहे,” अशा भावना केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केल्या. १.०५ लाख कोटीचे १३१ प्रकल्प महाराष्ट्रासाठी निश्चित करण्यात आले आहेत.  यात सागरमाला कार्यक्रमांतर्गत ४६ प्रकल्पास २७८ कोटीचे वित्तीय सहाय्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

“आज आपल्या सर्वांसाठी, विशेषतः महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठबळामुळे आपण बेलापूर जेट्टीची उभारणी पूर्ण करू शकलो याबद्दल मी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो,” असे ते पुढे म्हणाले.

सागरमाला प्रकल्पाच्या माध्यमातून आज नवी मुंबईला बेलापूर येथे अत्याधुनिक जेट्टी मिळाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य यांचा समसमान वाटा असलेल्या 8.37 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची मुंबई मेरिटाईम बोर्डाने यशस्वी अंमलबजावणी केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बेलापूर जेट्टी प्रकल्पाची सुरुवात जानेवारी 2019 मध्ये झाली होती आणि सप्टेंबर 2021 पर्यन्त हा प्रकल्प पूर्ण झाला. कोविड-19 महामारीमुळे निर्बंध लागू असतांनाही, हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.

बेलापूर जेट्टी आणि मुंबई बंदरावरील देशांतर्गत क्रूझ टर्मिनल दरम्यानच्या जलमार्ग टॅक्सी सेवेमुळे नवी मुंबई ते दक्षिण मुंबई दरम्यानचा साधारण दीड तासांचा प्रवासाचा वेळ, अर्ध्या तासापर्यंत कमी झाला आहे; या सेवेमुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल आणि मुंबई बंदराचा वाहतुकीसाठी उपयोग करण्यास प्रोत्साहन मिळेल,असेही त्यांनी सांगितले.

मुंबई बंदरात आणखी अनेक जेट्टी सेवा सुरु करण्याची केंद्र सरकारची योजना आहे, यात काटामरान आणि रो-पॅकस अशा दोन्ही सेवा असतील, असे ते म्हणाले.

केंद्र आणि राज्यातल्या  यंत्रणाच्या माध्यमातून 1.05 लाख कोटी रुपयांचे 131 प्रकल्प महाराष्ट्रात सुरु केले जाणार आहेत. या 131 प्रकल्पांपैकी, 2,078 कोटी रुपये किमतीच्या 46 प्रकल्पांना सागरमाला प्रकल्पाअंतर्गत वित्तीय सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सोनोवाल यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यांमध्ये, नागरी जलमार्ग वाहतूक सेवेसाठी प्रचंड वाव असून, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो: केंद्रीय मंत्री बंदर समूहाअंतर्गत, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा ठिकाणी, मच्छीमारांचे जीवनमान उंचावण्यासाठी 32 पेक्षा अधिक प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. 4 मच्छिमार बंदर प्रकल्पांनाही सागरमाला अंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

जलमार्ग टॅक्सी सेवेविषयी माहिती

मुंबई बंदर प्राधिकरण सातत्याने लोकांच्या सेवेसाठी दक्ष असून, त्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. दक्षिण मुंबईला जलमार्गाने, विविध ठिकाणांशी, जसे उरण, मांडावा, नवी मुंबई शी जोडले गेले आहे. भाऊचा धक्का ते मांडवा आणि अलिबाग दरम्यान रो-पॅकस फेरी सेवा देखील अतिशय यशस्वी झाली आहे.

कार्यालयीन वेळेत चाकरमान्यांना सोयीचे व्हावे, यासाठी या मार्गावरील प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवरुन कमी करत, 35 ते 45 मिनिटांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे, अंतर देखील 60 टक्क्यांनी कमी होणार आहे, ज्यामुळे इंधनाची तर बचत होईलच, शिवाय ही सेवा पर्यावरण पूरक देखील असेल. सध्या, सात स्पीड बोट्स ना प्रवासी वाहतूक करण्याचे परवाने मिळाले असून एका फेरीत 180 प्रवासी जाऊ शकतात. या जलमार्ग टॅक्सी, एका दिवसांत सहा फेऱ्या करु शकतात. मुंबई बंदर प्राधिकरण लवकरच, गरज पडल्यास या फेऱ्याची तसेच स्पीड बोट्सची संख्या वाढवणार असून लोकांच्या सेवेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. या सेवांमुळे, एलिफंटा लेण्या ते नवी मुंबई अशा पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे.नवी मुंबईतील प्रवाशांचा नवी मुंबई ते गेटवे ऑफ इंडिया हा तीन तास प्रवासाचा वेळ वाचणार आहे. तसेच हा प्रवास अतिशय सुखदायी असणार आहे.

नागरिकांच्या सोयीसुविधांसाठीचे उपक्रम सुरूच ठेवत, मुंबई बंदर प्राधिकरणाने रो-पॅकस टर्मिनल जवळच्या देशांतर्गत क्रूझ टर्मिनल पासून जलमार्ग टॅक्सी सुरु करण्यासाठीच्या सुविधाही विकसित केल्या आहेत. या जलमार्ग टॅक्सी सेवा नेरूळ, बेलापूर, एलिफंटा बेटे आणि जेएनपीटी इत्यादी स्थळांना जलमार्गाने जोडणार आहे. हा प्रवास आरामदायी तर असेलच, त्याशिवाय लोकांचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी देखील टळेल. त्याशिवाय ही वाहतूक पर्यावरण पूरक देखील ठरेल. जलमार्ग टॅक्सी पहिल्यांदाच मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना जलद आणि विश्वासार्ह दळणवळण सेवेने जोडणार आहे. सर्व हितसंबंधियांच्या सहकार्याने, प्राधिकरण इतर ठिकाणी देखील या सेवेचा विस्तार करणार आहे.