नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यात रसायनयुक्त पाणी भाजपचे डॉ.राजीव डोंगरे यांची कारवाईची मागणी

वैजापूर ,१६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  वैजापूर, गंगापूर व कोपरगाव या तीन तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या नांदुरमधमेश्वर जलदगती कालव्यातुन सध्या काळ्या रंगाचे पाणी वाहत असल्याने हे पाणी रसायन मिश्रीत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकांचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. त्यासाठी याबाबत सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे डॉ. राजीव डोंगरे यांनी केली आहे. 

डॉ. डोंगरे यांच्यासह कैलास पवार, प्रभाकर गुंजाळ, ज्ञानेश्वर इंगळे यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी उपविभागिय अधिकारी माणिक आहेर यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले. नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे वैजापूर गंगापूर व कोपरगाव या तीन तालुक्यांना सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी पुरवले जाते. जनावरांनाही कालव्याचे पाणी पिण्यासाठी पाणी पुरवण्यात येते. या तिन्ही तालुक्यातील सुमारे ४८ हजार हेक्टर क्षेत्र कालव्याच्या माध्यमातुन ओलिताखाली येणार आहे. सध्या या कालव्यातुन काळसर रंगाचे पाणी येत असल्याची माहिती भाजपाचे डॉ. राजीव डोंगरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन कालव्याची पाहणी केली. यावेळी कालव्यातुन दुषित पाणी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी वापरण्यात येते तसेच लाभक्षेत्रातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना यावर अवलंबुन आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकांचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा भाजपाकडुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डॉ. डोंगरे यांनी निवेदनात दिला आहे.