फर्दापूर येथील शिवस्मारक आणि भीमपार्कचे काम तात्काळ सुरु करण्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

औरंगाबाद,१५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्धतेसह सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन बांधकामास प्रत्यक्षात सुरूवात करण्यात यावी, असे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

Displaying WhatsApp Image 2022-02-15 at 5.42.11 PM.jpeg

मंत्रालयात शिवस्मारक व भीम पार्क उभारण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गटने, पर्यटन उपसंचालक, औरंगाबादचे जिल्हा क्रीड़ा अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

महसूल राज्यमंत्री श्री.सत्तार म्हणाले, अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांना देश-विदेशातून पर्यटक भेट देत असतात. या लेण्यांच्या सभोवताली सिल्लोड व सोयगाव शहराच्या परिसरात एकात्मिकरीत्या पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी अजिंठा-वेरूळ संवर्धन व विकास प्रकल्प यांची आखणी करण्यात आली.  फर्दापूर येथील ५५० एकर जमीन पर्यटन विकास महामंडळातर्फे अधिग्रहित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व आणि या लेण्यांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट देश-विदेशातील पर्यटकांसमोर मांडणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, त्यांनी प्रजेला दिलेले न्याय, अष्टप्रधानमंडळ, शत्रुसोबतच्या वेगवेगळ्या घटना, घडामोडी, युद्धांना मुत्सद्दीपणाने दिलेले प्रत्युत्तर, हा सर्व जीवनपट महाराजांच्या स्मारकाच्या रुपात साकारण्यात येणार आहे. स्मारकाच्या परिसरात महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री श्री.सत्तार त्यांनी सांगितले.

सिल्लोड तालुका क्रीडा संकुल आणि मुलींचे वसतिगृह बांधकामास गती द्यावी

सिल्लोड येथील तालुका क्रीडासंकुलाचा प्रस्ताव अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील विविध व्यायामशाळेत क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे. अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन परिपूर्ण प्रस्तावना मंजूरी द्यावी.  सामाजिक न्याय विभागाचे मुलींचे वसतिगृह सिल्लोड येथे बांधण्यासाठी लागणारी जागा यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाच्या पातळीवर योग्य ती कार्यवाही करावी. त्यासंबंधीचा परिपूर्ण प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात यावा. सिल्लोड-सोयगावमध्ये संविधान सभागृहे बांधण्याचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत, असे निर्देशही  श्री. सत्तार यांनी यावेळी दिले.

तालुक्यातील युवकांना व्यायामासाठी कसल्याही प्रकारच्या साहित्याची उणीव भासू नये यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही श्री.सत्तार यांनी सांगितले.