सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; वैजापूर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर ,१५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- सासरच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी शहरातील बन्सीलालनगर भागात उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरती गौरव दाभाडे (वय २४) या. बन्सीलाल नगर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी तिचा चुलत भाऊ विनय सोनवणे (या. मनमाड) यांनी तक्रार दिल्यानंतर पती गौरव नागनाथ दाभाडे, सासरा नागनाथ शंकर दाभाडे, सासु निर्मला नागनाथ दाभाडे व दीर सौरभ नागनाथ दाभाडे सर्व या. बन्सीलाल नगर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हुंड्याचे एक लाख रुपये व पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरहुन पंधरा लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत आरतीचा शारिरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरती हिचा वैजापूर शहरातील बन्सीलाल नगर येथील गौरव नागनाथ दाभाडे यांच्याशी डिसेंबर २०२१ मध्ये विवाह झाला होता. विवाहाच्या वेळी पाच लाख रुपये हुंडा, आठ तोळे सोने व संसारोपयोगी वस्तु देण्यात आल्या. पण लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी आरतीकडे हुंड्याचे राहीलेले एक लाख रुपये व पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेराहुन पंधरा लाख रुपये आणण्याची मागणी केली. ही मागणी पुर्ण होत नसल्याने त्यांनी वारंवार तिला मारहाण करुन घराबाहेर हाकलुन दिले. याबाबत आरतीने फोन करुन घरी कळवल्यानंतर घरच्यांनी त्यांना समजावुन सांगितले. मात्र त्यांनी त्रास देणे सुरुच ठेवले. अखेर या त्रासाला कंटाळुन आरतीने शनिवारी घरातील पंख्याला गळपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी पती, सासु सासरा व दीर यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ताहेर पटेल हे करीत आहेत.