शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता:शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करु नये :छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई,१४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.  तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी

पंढरपूर पोटनिवडणूक : नागरिकांना मतदानासाठी प्रवास करण्याबाबत सूचना

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी हा उत्सव  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन साजरा न करता आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती ) साजरी करत असताना शिवज्योत वाहण्याकरिता २०० भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरिता ५०० भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी अथवा इतर गड / किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतात. परंतु, यावर्षी कोविड -१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करावा.

दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती” च्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे सर्वांवार बंधनकारक आहे, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.