महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण ,प्रकृती स्थिर

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. माझे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आले आहे. गेल्या १० दिवसांमध्ये माझ्या जवळच्या संपर्कात असलेल्या लोकांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, अशी विनंती अमिताभ बच्चन यांनी केली आहे. अमिताभ यांना करोनाची लागण झाल्याने त्यांचे लाखो चाहते काळजीत पडले आहेत.

अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्वत: आपल्या आजारपणाबाबत माहिती देत संभ्रम वाढू दिलेला नाही. अमिताभ यांना आज सायंकाळी रुग्णायलात दाखल करण्यात आलं. त्यानंतर रात्री १० वाजून ५२ मिनिटांना त्यांनी ट्विट केलं व तपशील दिला. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने संबंधित यंत्रणांना याबाबत कळवलं आहे. घरातील अन्य सदस्य आणि स्टाफचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांचा करोना चाचणी अहवाल अजून आलेला नाही. त्याची प्रतीक्षा आहे’, असे नमूद करतानाच अमिताभ यांनी संपर्कातील अन्य व्यक्तींनाही आवाहन केलं आहे. गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती अमिताभ यांनी केली आहे.

Image

दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत, तसंच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं राजेश टोपे म्हणाले. तसंच बच्चन कुटुंबातल्या इतरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत. 

​दुसरीकडे अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. शनिवारी सकाळी माझे आणि वडिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आम्हा दोघांना कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याबद्दल आम्ही संबंधित यंत्रणांना माहिती दिली आहे, तसंच आमचं कुटुंब आणि आमच्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. सगळ्यांनी शांत राहा, घाबरून जाऊ नका, असं अभिषेक बच्चन म्हणाला आहे. ​अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत, अशी प्रतिक्रिया राजेश टोपेंनी दिली आहे. ​​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *