जागतिक पर्यटक विदर्भाकडे वळेल असे नियोजन करा – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

नागपूर,१४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- नागपूर आणि विदर्भामध्ये विपुल वनसंपदा, वाघासारख्या वन्यजीवांची वाढती संख्या, विस्तीर्ण खाणी, मोठे जलसाठे, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, रस्ते आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीचे जाळे उपलब्ध आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या पर्यटनाला पूरक अशा प्रस्तावांचे नियोजन करा. पर्यटक चार दिवस नागपूर विदर्भात थांबेल अशा समन्वयाचे नियोजन करा, अशी सूचना राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे केली.

नागपूर जिल्ह्याच्या पर्यटन आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, अभिजित वंजारी, राजू पारवे, नरेंद्र बोंडे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी आर.विमला, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वविद् विजयकुमार नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई, राज्य पूरातत्व विभागाच्या जया वाहने यासह पर्यटन, पर्यावरण विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी चंद्रपूर येथे भेट दिली. त्यानंतर आज नागपूर येथे सकाळी नांदगाव येथील फ्लॅयॲश पाँडची पाहणी केली. त्यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पर्यटन विकासाबाबत चर्चा केली. विदर्भाकडे प्रेक्षणीय, ऐतिहासिक, अध्यात्मिक असे अनेक पर्यटनस्थळ आहेत. यामध्ये उत्तम समन्वय आवश्यक आहे. कोणताही प्रकल्प बघण्यासाठी जागतिक पर्यटक एका दिवसांसाठी येणार नाही. तो काही दिवस येथे थांबला पाहिजे. त्यामुळे देशाचे नव्हे जगाचे टायगर कॅपिटल, विस्तीर्ण खाणी, विपुल जनसंपदा यासोबत आणखी काही भव्यदिव्य बघण्याची अपेक्षा पर्यटकांना असते. त्यामुळे पर्यटनातील सर्व घटकांचा सेतू बांधून उत्तम प्रस्ताव तयार करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी नागपुरात जंगल सफारीसोबतच ‘हेरीटेज वॉक’ आयोजित करण्याबाबतही सांगितले.

या बैठकीत ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पर्यटन विकासाबाबत जिल्ह्याला वाढीव निधी उपलब्ध करण्यात यावा. मध्यप्रदेशच्या धर्तीवर युको टुरीजमचा विकास करण्यात यावा. विदर्भातील पर्यटनाचे मुंबई व राष्ट्रीय स्तरावर ब्रँडींग आणि मार्केटींग करण्यात यावे. गोरेवाडा प्रकल्पातील उर्वरीत कामे तातडीने पूर्ण व्हावीत. रामटेक परिसरातील अंभोरा येथे धार्मिक पर्यटनाचा प्रस्तावाला तातडीने मान्यता द्यावी. अंभोरा ते पेंच प्रकल्प क्रूझ व हाऊसबोट प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी केली. खासदार कृपाल तुमाने यांनी खाण पर्यटनाला विदर्भात वाव असून त्यासाठी नव्याने विभागाने तयारी करण्याची मागणी केली. आमदार आशिष जयस्वाल यांनी पर्यटनाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासोबतच सर्व ठिकाणी प्लास्टीक बंदीबाबत धोरणात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या सर्व प्रस्तावांवर सकारात्मक विचार करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भात पर्यटन विकासाची क्षमता आहे. त्यामुळे निश्चितच पर्यटनाला चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले.

विमान उड्डाण क्षेत्रात विदर्भातील युवकांना नवीन संधी उपलब्ध – पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

विमान उड्डाण क्षेत्रात विदर्भातील युवकांना नवीन संधी उपलब्ध – पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

नागपुरातील उड्डाण क्लबची गौरवशाली परंपरा असून हा क्लब पुनरुज्जीवित झाल्यामुळे विदर्भातील युवकांना विमानउड्डाण प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. नागरी उड्डाण क्षेत्रात जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या विविध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असलेल्या नागपूर उड्डाण क्लबच्या हॅंगरमध्ये वैमानिक प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष प्रारंभ श्री. ठाकरे यांचे हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत होते. यावेळी मदत व पुनर्वसन तसेच इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार कृपाल तुमाने, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त तथा नागपूर उड्डाण क्लबच्या अध्यक्ष प्राजक्ता लवंगारे-वर्मा, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे आदी उपस्थित होते.

नागपूर उड्डाण क्लब हा पुनरुज्जीवित होवून प्रशिक्षणासाठी पुन्हा उपलब्ध झाला आहे. मध्य भारतातील सर्वात गौरवशाली असलेला हा क्लब भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा कार्यान्वित होत असल्याचे सांगताना आदित्य ठाकरे म्हणाले की, येथील युवकांना विमान उड्डाणाच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांच्या पंखांना हा क्लब बळ देणार असून या क्षेत्रात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या युवकांसाठी नवे दालन खुले झाले आहे आणि युवक सुद्धा भरारी घेण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, नागपूर उड्डाण क्लबची स्थापना 1947 मध्ये झाली असून या क्लबने भारताला व जगाला अनेक वैमानिक दिले आहेत. मध्यंतरी उड्डाण क्लब बंद झाल्यामुळे शासनाने स्वतःच्या नियंत्रणाखाली आणून परत सुरु करण्याचा प्रयत्न केला. आज या क्लबच्या प्रत्यक्ष उड्डाणाला सुरुवात होत आहे. नागपूर उड्डाण क्लब येथे प्रशिक्षणार्थीसाठी पायाभूत सुविधा तसेच मध्य भारतातील सुसज्ज अशी प्रशिक्षण संस्था निर्माण व्हावी, यादृष्टीने शासनाने 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील युवकांना वैमानिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाज्योतीकडून 20 विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून या क्लबला अडीच कोटी रुपये निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. चंद्रपूर येथे सुद्धा उड्डाण क्लब सुरु करण्यासाठी डीजीसीएची परवानगी घेण्यात येत असून येथे व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणाला सुद्धा सुरुवात होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वैमानिक प्रशिक्षणाचा प्रारंभ केला. तसेच येथे बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले. नागपूर उड्डाण क्लबच्या अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी स्वागत करून नागपूर उड्डाण क्लब वैमानिक प्रशिक्षणासाठी सज्ज असून क्लबकडे प्रशिक्षणासाठी चार विमाने आहेत. या क्लबने आतापर्यंत देशाला बरेच वैमानिक दिले आहेत. उड्डाण क्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच युवकांची या क्षेत्रातील आवड लक्षात घेता, वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. या क्लबमध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे प्रशिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएडीसीने 5.97 एकर जागा नवीन हँगर बांधकामासाठी उपलब्ध करून दिली असून यामध्ये मल्टीइंजिन विमान, दोन सी-प्लेन, हेलिकॉप्टर आणि सिम्युलेटर ठेवण्याचा देखील प्रस्ताव आहे. यासाठी 20 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

‘माझी वसुंधरा’ मोहीमेचा विभागीय आढावा

विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

पर्यावरण संवर्धन करतांना विकासाला खोळंबा होतो हा गैरसमज आहे. अनेक प्रकल्प उत्तम समन्वयातून यशस्वीरित्या साकारले आहे. त्यामुळे योग्य नियोजनातून व राजकीय तसेच अन्य व्यासपीठांवर पर्यावरण विषयक चर्चा घडवून आणल्यास मार्ग निघू शकतो. विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात ‘माझी वसुधंरा’ या मोहिमेचा विभागीय आढावा आज त्यांनी घेतला. या आढावा बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, ‘माझी वसुधंरा’ अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे, विभागातील सहाही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर व चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नगर प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त संघमित्रा ढोके यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे  अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरणातील बदल बघता, पडसाद आपल्या दारात उमटायला लागले आहे. त्यामुळे पर्यावरण विषयक तात्काळ प्रतिसाद देण्याची हीच वेळ आहे. पुढच्या पिढीसाठी नाही तर आता आपल्या स्वत:साठी काम करण्याची गरज आहे. डोळसपणे काम केल्यास विकासाच्या आड पर्यावरण येत नाही. सुरुवातीला अडथळा म्हणून बघणाऱ्या विभागाचे माझी वसुधंरा अभियानामुळे महत्व बदलले आहेत. त्यामुळे आता माझी वसुधंरा मोहिमेचे अभियान झाले आहे. लोकसहभागातील या अभियानाला प्रत्येक नागरिकांची सवय बनविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी उत्तमपणे काम करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पर्यावरण संरक्षणासाठी जागृती, निर्धारण आणि प्रतिसाद या त्रिसृत्रीचा वापर करणे आवश्यक आहे. समस्येच्या मूळापर्यंत जाऊन निराकरण करणे आवश्यक आहे. पर्यावरण विषयाची चर्चा आता घरा-घरात झाली पाहिजे. संकट दारावर आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या राजकीय व्यासपीठावरही चर्चा झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर विभागाने या अभियानात अतिशय उत्तम काम केले आहे. त्यामुळे विभागाच्या टीमकडून आणखी अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या दूरदृष्टीमुळे या विभागाची ओळख बदलली आहे. ‘माझी वसुधंरा’ या अभियानातील सहभागाने हे अभियान लोकचळवळ झाले आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने हे अभियान आपल्या महत्वपूर्ण योजनेत समाविष्ट केल्यास प्रत्येक जिल्ह्यांमध्ये लक्षणीय कामे होऊ शकतात. त्यामुळेच उंच उडी मारण्याची स्पर्धा आम्ही अभियानात ठेवली आहे. काही कामे अधिकाऱ्यांच्या आयुष्यात स्वत:साठी असतात. त्यामुळे स्वत:चे समाधान म्हणून या अभियानाकडे लक्ष वेधा. नागपूर विभाग माझी वसुधंराच्या दुसऱ्या पर्वात पहिल्या तीनमध्ये नक्कीच असले पाहिजे, असे नियोजन करा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

तत्पूर्वी ‘माझी वसुधंरा’ अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे यांनी अभियानासंदर्भात राज्यस्तरीय माहिती दिली. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागातील अभियानाअंतर्गत झालेल्या कामाचा आढावा सादर केला. तर प्रत्येक जिल्ह्यातील अभिनव प्रयोगाची माहिती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त संघमित्रा ढोके यांनी केले.