देवगिरी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कुणाल भोसले बनला अमेरिकेतील नामवंत कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी

औरंगाबाद,१४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कुणाल भोसले यांची अमेरिकेतील उद्योग क्षेत्रातील नामवंत एक्सट्रुड होन कॉर्पोरेशन (Extrude Hone Corporation) या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नुकतीच निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक तेजनकर यांनी दिली.

    ऑटोमोबाईल, एरोस्पेस, मेडीकल, हेवी इंजिनइरिंग इंडस्ट्रीमध्ये एक्सट्रुड होन कॉर्पोरेशन या कंपनीचे मशीन टुल्स व ऍक्सेसरीज वापरले जातात. अमेरिका, जर्मनी व चीन ह्या तीन देशात या कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टस्‌ तर भारतासह जवळपास 25 देशात सेल्स व सर्व्हिस नेटवर्क आहेत. कुणाल भोसले यांनी सन 1994-95 यावर्षी देवगिरी महाविद्यालयातून विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिका येथील परडू विद्यापीठातून बॅचलर इन इंडस्ट्रीयल इंजिनइरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. जर्मनी येथे एक्सट्रुड होन कॉर्पोरेशन या कंपनीत त्यांची लीन मॅन्युफॅक्चरिंग इंजिनइर म्हणून निवड झाली. जर्मनीत पाच वर्ष उल्लेखनीय कार्य केल्यानंतर याच कंपनीत त्यांची 2017 यावर्षी अमेरिका खंडाचे व्यवस्थापकीय संचालकपदी निवड करण्यात आली होती.

याठिकाणी सुध्दा काम करत असताना गुणवत्तेच्या जोरावर कुणाल भोसले यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करत आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला. कंपनीने देखील कुणाल भोसले यांच्या या कार्याची दखल घेत 12 फेब्रुवारी रोजी एक्सट्रुड होन कॉर्पोरेशन या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड केली आहे.

देवगिरी महाविद्यालय विद्यार्थ्यांना पारंपारीक शिक्षणाबरोबरच नेहमीच रोजगाराभिमूख शिक्षण देत आले आहे. अवघ्या 42 व्या वर्षी कुणाल भोसले यांच्या निवडीमुळे देवगिरी महाविद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे डॉ.अशोक तेजनकर यांनी सांगितले. कुणाल भोसले हा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य तथा अमेरिका येथील केनामेटल लि. चे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक भोसले यांचे चिरंजीव आहेत.

आ.सतीश चव्हाण यांची प्रतिक्रिया

    उद्योग क्षेत्रात स्व-कर्तृत्व व गुणवत्तेच्या बळावर कुणालने मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद असून उद्योग क्षेत्रात आपले भविष्य घडू पाहणार्‍या नव तरूणांसाठी दिशा दर्शक आहे. कुणालच्या या  उल्लेखनीय यशामुळे देवगिरी महाविद्यालय तसेच मराठवाड्याचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे.