प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन

पुणे ,१२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  बजाज ऑटोमाबईलचे माजी अध्यक्ष  आणि ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं वयाच्या 83 व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झालं आहे.  बजाज हे गेल्या काही काळापासून  कर्करोगाने त्रस्त होते. गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान राहुल बजाज यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना हार्ट आणि लंग्स संबंधित समस्या असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. वृद्धापकाळामुळे उपचाराला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. हळहळू त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज अखेर त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Image

राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  त्यांच्या जाण्याने विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज ग्रृपची सूत्र हातात घेतली. राहुल बजाज यांच्या नेतृत्वात बजाज ग्रृपचा टर्नओव्हर हा 7. 2 कोटींवरुन थेट 12 हजार कोटीवर जाऊन पोहचला. बजाज स्कूटर विकणारी देशातील अव्वल ग्रृप म्हणून नावारुपास आला. त्यानंतर 2005 मध्ये ग्रृपची जबाबदारी त्यांचे पुत्र राजीव बजाज यांना देण्यात आली.तेव्हा राहुल बजाज यांनी राजीव यांना मॅनेजिंग डायरेक्टर पदाची जबाबदारी सोपवली होती. यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सची देश-विदेशातून मागणी वाढीस लागली. 

Image

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

बजाज उद्योग समुह हा देशातील टॉप उद्योग समुहांपैकी एक आहे. बजाज ऑटोला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. बजाज उद्योग समुहाच्या माध्यमातून देशात मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. राहुल बजाज यांनी या उद्योग समुहाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या कार्याची दखल म्हणून 2001 मध्ये राहुल बजाज यांचा भारत सरकारच्या वतीने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

बजाज यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार

दरम्यान राहुल बजाज यांचे पार्थिव थोड्याच वेळात रुबी हॉल हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी आकुर्डी येथील कंपनीत ठेवलं जाणार आहे, त्यानंतर रविवारी संध्याकाळी चार वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.