औद्योगिक पाया मजबूत करण्यासाठी राहुल बजाज यांचं महत्त्वाचे योगदान:शरद पवारांकडून श्रद्धांजली

पुणे ,१२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल बजाज यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

शरद पवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाची औद्योगिक उभारणी करण्यासाठी काही लोकांचे योगदान महत्त्वाचे होते. त्यांची यादी करायची झाली तर जे.आर.डी. टाटा, महाराष्ट्राचे शंकरराव किर्लोस्कर यांचे नाव पुढे येईल. अशा अनेक मान्यवर व्यक्तींनी स्वातंत्र्यानंतर देशाचा औद्योगिक पाया मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. यांच्या कालखंडानंतर दुसरी पिढी देशात उभी राहिली. त्यांनी आधुनिक दृष्टीकोन ठेवून औद्योगिकरणात प्रचंड लक्ष घातले. त्या मालिकेमध्ये राहुल बजाज यांचा उल्लेख प्रकर्षाने करावा लागेल.बजाज समूह वर्ध्यात आला. गांधी कुटुंबीयांचे वास्तव्य बजाज कुटुंबियांच्या समवेत असायचे. त्यांचे व्यवसाय त्या परिसरामध्ये होते. वर्धा भागातील मोठा व्यवसाय कापसाची खरेदी-विक्री होता. पण नंतरच्या पिढीने वेगळ्या दृष्टीने जाण्याचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थाने औद्योगिक क्षेत्रात विशेषतः ऑटोमोबाइल क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर योगदान देण्याचे कर्तृत्व राहुल बजाज यांनी दाखवले.

राहुल बजाज यांची कारखानदारी पुण्यापासून सुरू झाली. त्यांच्या कारखानदारीचे नेतृत्व त्यांच्या आधीच्या पिढीतील काही घटक मुंबईमध्ये बसून करत होते. उच्च शिक्षण झाल्यानंतर राहुल बजाज यांच्यावर ज्यावेळी जबाबदारी आली तेव्हा त्यांनी मुंबईत बसून कारखाना चालवायचा नाही हा पहिला निर्णय घेतला. राहुल बजाज हे एकमेव व्यक्तिमत्व असेल ज्यांनी सबंध आयुष्य आणि वास्तव्य जिथे आपला कामगार काम करतो त्या प्रांगणात आकुर्डीमध्ये व्यतित केले. उभे आयुष्य त्यांनी कारखाना आणि त्यांचे कामगार यांच्या समवेत घालवले. औरंगाबाद जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढावे ही राज्य सरकारची भूमिका होती. कारखान्याचा विस्तार आकुर्डीपुरता सीमित न ठेवता पुढील काळात राज्य सरकारच्या भूमिकेला मोठा प्रतिसाद बजाज यांनी दिला. तिथेही मोठे योगदान बजाज समूहाने दिले आहे. राज्य सरकार आणि बजाज यांनी मिळून साताऱ्यालाही लहानसा कारखाना काढला होता  असंही शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवारांकडून श्रद्धांजली, सांगितले मैत्रीचाही किस्से

राजकारणात कोणाची काही मतं असतात. मात्र उद्योजक आपली मतं अतिशय काळजीपूर्वक आणि सावधपणे राज्य अथवा केंद्र सरकारला चिंता वाटू नये अथवा नाराजी न व्हावी याची काळजी घेऊन मत व्यक्त करत असतात. राहुल बजाज हे वेगळे उद्योजक होते. समाजाच्या देशाच्या हिताचे योग्य असेल त्यासाठी ते सरकारला न पटणारे जरी मत असले तरी स्पष्टपणे मांडायचे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या काही संस्थांमध्ये सुद्धा त्यांना दिलेली जबाबदारी बजाज यांनी घेऊन तिथेही आपले कर्तृत्व दाखवले. ते स्पष्टवक्ते होते. त्यांचा उपयोग राष्ट्रीय पातळीवर अधिक करण्यासाठी आम्ही त्याकाळी निर्णय घेतला आणि देशाच्या राज्यसभेत त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्यांना मर्यादित कार्यकाळ जरी मिळाला तरी राज्यसभेतील त्यांचे कार्य हे लक्षात राहील असे होते. राज्यसभेत आर्थिक, राष्ट्रीय प्रश्नांवर उत्तम प्रकारचे योगदान त्यांच्याकडून मिळाले. राहुल बजाज बोलणार हे समजल्यावर सभागृहात सभासदांची उपस्थिती पूर्णपणे असायची. त्यांच्या भाषणात राजकीय आकस कधीही नव्हता. पुण्यामधील औद्योगिक क्षेत्रातील मित्र म्हणून सांगता येईल, अशा मालिकेतील माझा व्यक्तिशः मैत्रीचा ओलावा राहुल बजाज यांच्यासोबत अखंडपणाने राहिला. अनेक गोष्टींसाठी त्यांचा मला पाठिंबा होता. जी मतं पटली नाही तर स्पष्टपणाने त्यावर विरोधाची मत मांडण्यासाठी सुद्धा त्यांनी कधी कमतरता दाखवली नाही. त्यांनी केलेली टीका ही माझ्यासह अनेकांनी आनंदाने स्वीकारली. बजाज कुटुंबीयांशी माझा दोन पिढ्यांचा संबंध होता. रामकृष्ण बजाज आमचे मित्र होते. मी ज्यावेळी राजकारणात आलो. राज्य पातळीवर युवक काँग्रेसचे काम करायला लागलो तेव्हा रामकृष्ण बजाज हे देशाच्या युवक काँग्रेसच्या चळवळीत एक महत्त्वाचे मार्गदर्शक होते. रामकृष्ण बजाज यांच्या उद्योगाला खरी दिशा देण्याचे काम राहुल बजाज यांनी केले. त्यांची प्रकृती काही दिवसापासून ठिक नाही अशी माहिती मिळत होती. जे काही घडत होते ते आजच्या दिवशी दुर्दैवाने सत्य निघाले. आज ते आपल्यात राहिले नाहीत. मी व्यक्तिगत सलोख्याच्या मित्राला मुकलो. पण मैत्रीपेक्षासुद्धा देशाला प्रचंड योगदान देणाऱ्या उद्योजकाला, प्रशासकाला आणि राष्ट्राच्या हिताचा विचार करणाऱ्या व्यक्तिमत्वाला सबंध देश मुकला. त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले होते. एक चांगली व्यक्ती आज आपल्यातून निघून गेली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात सहभागी आहे. ते गेले पण त्यांचे स्मरण, त्यांची आठवण अखंड राहील.