वैजापूर तालुक्यातील अवसायनात निघालेल्या पाच सहकारी संस्थाच्या संचालक मंडळाला गुन्हे अन्वेषण विभागाची नोटीस

जफर ए.खान

वैजापूर,१२ फेब्रुवारी:- अवसायनात निघालेल्या वैजापूर तालुक्यातील पाच सहकारी संस्थाच्या संचालक मंडळाला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस गुन्हे अन्वेषण विभाग,औरंगाबाद कार्यालयाने शनिवारी (ता.12) बजावली.

क्रांतिचौक पोलीस ठाणे औरंगाबाद येथे 2017 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात उच्च न्यायालय खंडपीठ यांच्या आदेशान्वये राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचेमार्फत तपास सुरू आहे. यासंदर्भात औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या व अवसायनात निघालेल्या वैजापूर तालुक्यातील संत गंगागिरी महाराज जिनिंग-प्रेसिंग संस्था मर्यादित लाडगांव, नौगाजी नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर, नवभारत मजूर सहकारी पतसंस्था, बेलगांव, करंजगाव मजूर सहकारी संस्था मर्यादित करंजगांव व नौगजीबाबा वीटभट्टी उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, वैजापूर या पाच संस्थाच्या कर्जाचे निर्लेखन झालेले आहे.

Displaying IMG_20220212_233927.jpg

या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासकामी गुन्हे अन्वेषण विभाग औरंगाबाद  कार्यालयात कागदपत्रांसह हजर राहण्याची नोटीस गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष जाधव यांनी संचालक मंडळाला बजावली आहे. बँकेचे अधिकारी व गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज वैजापूर येथे येऊन ही नोटीस बजावली.नोटीस बजावण्यात आलेल्या संस्था अनेक वर्षांपूर्वी अवसायनात निघालेल्या असून संत गंगागिरी महाराज जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काही वर्षांपूर्वी केल्याची तालुक्यात चर्चा आहे.