उत्कृष्ट तबलावादन, सुमधूर बासरीवादन, रागांच्या पखरणीमुळे औरंगाबादकर रसिक मंत्रमुग्ध

उस्ताद डॉक्टर गुलाम रसूल संगीत महोत्सव -2022 उत्साहपूर्ण वातावरणात
औरंगाबाद,१२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- उत्कृष्ट तबलावादन, सुमधूर बासरीवादन, रागांच्या पखरणीमुळे औरंगाबादकर रसिक शनिवारी मंत्रमुग्ध झाले.

औरंगाबाद येथील “श्री शंकर कुंडलिनी अवेकनिंग अँड रिसर्च” संचालित “योगीराज संगीत अकादमी” आयोजित “उस्ताद डॉक्टर गुलाम रसूल संगीत महोत्सव -2022” चे आयोजन 12 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.यंदा या महोत्सवाचे बारावे वर्ष होते.निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिर येथे हा महोत्सव रंगला. 

May be an image of 1 person

महोत्सव साजरा होताना सुरुवातीला भारतरत्न गानसरस्वती लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.या वर्षी या महोत्सवात दिल्ली येथील पंडित श्री.अजय प्रसन्न यांचे बासरी वादन, भोपाळ येथील पंडित अंशुल प्रताप सिंह यांचे तबलावादन, औरंगाबाद येथील पंडित डॉक्टर पराग चौधरी यांचे शास्त्रीय गायन, विदुषी मीनाक्षी पराग चौधरी यांचे शास्त्रीय गायन तसेच अनुराधा कुलकर्णी जोशी यांचे शास्त्रीय गायन झाले.

महोत्सवाची सुरुवात अनुराधा कुलकर्णी यांच्या शास्त्रीय गायनाने झाली त्यांनी राग”भीमपलास” विलंबित खयाला सादर केला. “राधा धर मधू मिलिंद” नाट्यपद पेश करत रसिकांची वाहवा मिळवली.

भोपाळ येथील अंशुल प्रताप सिंग यांनी महोत्सवाचे दुसरे पुष्प गुंफले. त्यांनी विलंबित “तीनताल” सादर केला. यानंतर बनारस घराण्याची उठाण, ठेका, अवचार, गत, कायदा, रेले, चक्रधार पेश करत तबलावादानातील तयारी दाखवून दिली. रसिकांच्या वेळोवेळी पडलेल्या टाळ्या आणि वाहवा मिळवत अंशुल यांनी शेवटी “बनारस मे गंगा आरती… डमरू प्रकार करत समारोप केला.

यानंतरचे पुष्प विदुषी मीनाक्षी चौधरी यांनी गुंफताना राग “पुरीया धनश्री”सादर केला यातबडा खयाल “बल बल जाऊ “ही रचना रसिकांची वाहवा मिळवून गेली. यानंतर त्यांनी “मन लागो मेरो यार फकिरी मे”या कबीर भजनाने त्यांनी समारोप केला.

May be an image of 3 people, people standing and text that says "शंकर कुंडलिनी अवेकनिंग ॲण्ड रिसर्च योगीराज संगीत अकादमी औरंगाबाद टूस्ट संचलित व आयोजित ताद डॉ. गुलाम रसल महोत्सव- २०२२ वर्ष-१२वे"

यानंतर पंडित पराग चौधरी राग “मेघ” सादर केला, यात बडा ख्याल “आस लगी …”सादर करून त्यांनी महोत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. रागाची पेशकश ठेहराव आणि उचित रागदारी काय असते हे चौधरी यांनी दाखवून दिले.पराग चौधरी यांनी कबीर वाणीने शेवट केला.पंडित पराग चौधरी यांच्यानंतर पंडित अजय प्रसन्न सुमधुर बासरी वादनाने महोत्सवात शेवटचे पुष्प गुंफून समर्पक समारोप केला गेला.

या कला सादर करणाऱ्यांना सहवादक म्हणून हार्मोनियमवर प्राध्यापक दिलीप दोडके,विनायक पांडे, गजानन केचे, कुमारी श्रावणी मुधळवाडकर हे होते तर व्हायोलिनवर श्री.शंकर विधाते आणि तबल्यावर अंशुल प्रताप सिंह, महेश सोळंके आणि सुधांशू परळीकर यांची साथसंगत लाभली. 

हा महोत्सव सर्वांना विनामूल्य होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम चौधरी हे होते. उद्घाटन म्हणून ऍड. दिनकर देशपांडे यांनी केले.तर प्राध्यापक ए.जी. वाडेकर, डी.आर.कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.या महोत्सवाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, कल्पलता पाटील भारस्वाडकर, सुधीर पाटील, धनंजय कुलकर्णी, वसुधा पुरोहित यांनी शुभेच्छा कळवल्या होत्या.

सीतारामय्या फाउंडेशन तर्फे जीवन गौरव कला गौरव पुरस्कार यावेळी देण्यात आला हा पुरस्कार श्रीमती स्नेहप्रभा वेलणकर यांना दिला गेला त्यांच्या वतीने त्यांच्या सुनेने हा पुरस्कार स्वीकारला.या महोत्सवाला कोविडच्या सर्व नियमांना पाळून सादर करण्यात आले. शासकीय नियम व निर्बंध पाळून हा महोत्सव आयोजित करण्यात योगीराज संगीत अकादमीच्या विद्यार्थी मंडळाने खूप मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रकाश मुधळवाडकर यांनी केले. कोविड कार्यकाळानंतर दोनवर्षानी महोत्सव भरल्याने रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती.