पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या नागमठाण येथील गोदावरी नदीवरील पुलाचे रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे यासाठी ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

वैजापूर ,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या नागमठाण येथील गोदावरी पुलाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी दिलेला जलसमाधी घेण्याचा इशारा अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आज मागे घेण्यात आला.

नागमठाण येथील गोदावरी नदीवरील पुलाचा सर्व्हे 1980 मध्ये झालेला असून तेंव्हा पासूनच्या प्रदीर्घ संघर्षानंतर 2009 मध्ये प्रत्यक्षात पुलाच्या कामाला सुरुवात झाली.त्यानंतर काम बंद पडले. गेल्या अनेक वर्षांपासून पुलाचे काम अपूर्णावस्थेत असून, सद्यस्थितीत काम बंद आहे. पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे व तसे लेखी आश्वासन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून मिळावे अन्यथा गुरुवारी(ता.10) गोदावरी नदीपात्रात सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार आहोत या आशयाचे निवेदन नागमठाण परिसरातील ग्रामस्थांनी 24 जानेवारी 2022 रोजी विभागीय आयुक्तांना दिले होते. या निवेदनावर गणेश तांबे, प्रवीण चव्हाण, सुभाष खुरुद, डॉ. बाबासाहेब डांगे, मोहन दिवटे, रामनाथ भवर, गणेश ठोंबरे, मनोज विरकर, पवन चव्हाण, कृष्णा गवळी, शरद वाढे, राजेंद्र खुरुद आदींच्या सह्या होत्या.निवेदनानुसार आज सकाळी ग्रामस्थ गोदावरी पुलावर जलसमाधी आंदोलन करण्यासाठी जमा झाले होते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत लेखी आश्वासन न मिळाल्यास सामूहिक जलसमाधी घेण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी पुलाचे काम 17 फेब्रुवारीपासून हाती घेण्यात येण्यात येऊन 30 जून 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे लेखी आश्वासन आंदोलनस्थळी ग्रामस्थांना दिले.भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. लेखी आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले.