महापालिकेच्या लेटर हेडवर अकरा जणांना विविध पदांवर नियुक्त्या:पोलिसांनी सात आरोपींच्‍या मुसक्या आवळल्‍या

औरंगाबाद,१० फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद महापालिकेच्या लेटर हेडवर आयुक्तांची बनावट स्वाक्षरी करून अकरा जणांना विविध पदांवर नियुक्त्या देण्यात आल्याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी दि.१० सकाळी आणखी सात आरोपींच्‍या मुसक्या आवळल्‍या. सातही आरोपींची रवानगी न्‍यायालयीन कोडठीत करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी दिले.

उमेश प्रमोदराव चव्‍हाण, रोहन शिवाजी जाधव, सोपान उत्‍तम खांडेभराड, नितीन ज्ञानेश्‍वर महालकर, सचिन ज्ञानेश्‍वर मलाकर, प्रतिम प्रमोदराव चव्‍हाण आणि विशाल राम तायडे अशी अटक करण्‍यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजु काशीनाथ सुरे यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, महापालिकेच्या लेटरहेडवर अकरा जणांना अग्निशमन विभागात नोकरी देण्यात आल्याबद्दलचे पत्र देण्यात आले आहे. त्यावर आयुक्त पांडेय यांची स्वाक्षरी केलेली आहे. मुळात ही स्वाक्षरी बनावट असून, लेटरहेडवर टाकण्यात आलेला आवक-जावक क्रमांक देखील बोगस आहे. या क्रमांकाची पडताळणी केली असता त्याचा संदर्भ लागत नाही. या नियुक्त्यांची माहिती गुरुवारी, ४ मार्च रोजी पांडेय यांच्या मोबाइलवर व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त झाली. पांडेय यांनी त्याची लगेच दखल घेत पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्‍यानूसार, प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.
गुन्‍ह्यात यापूर्वी अटक करण्‍यात आलेल्या आरोपींकडून बनावट कागदपत्र, बँक पासबुक, धनादेश, महापालिके विविध कार्यालयांसबंधीचे बनावट कागदपत्र, रबरी शिक्के, स्‍टॅंम्प पॅड, मोबाइल, पेनड्राईव्‍ह, दुचाकी (क्रं.एमएच-२०-एफसी-७५४४) आणि गाडीच्‍या दोन नंबर प्‍लेट, फायर हाउज पाईप, फायर ब्रिगेडसंबंधी लेटरहेड, लॅपटॉप, फायर होज पाईप खरेदी केलेले बील असा ऐवज जप्‍त करण्‍यात आला आहे.