सिल्लोड, सोयगाव तालुक्यांतील विजेच्या समस्या मार्गी लावण्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देश

औरंगाबाद,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- सिल्लोड व सोयगाव तालुक्यांतील वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामाची आढावा बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.    

Displaying IMG-20220209-WA0151.jpg

महावितरणच्या स्वतंत्र सिल्लोड विभागाची निर्मिती झाल्यामुळे ग्राहक सेवेत झालेल्या सुधारणेबाबत राऊत व सत्तार यांनी समाधान व्यक्त केले. सिल्लोड व सोयगाव तालुक्यांत कृषिपंपांच्या रोहित्रांची क्षमतेत वाढ करावी, नवीन रोहित्र बसवावेत तसेच जीर्ण झालेल्या तारा बदलण्याची मागणी सत्तार यांनी केली. याबाबत उपलब्ध निधीतून ही कामे त्वरित करण्यात यावीत तसेच वाढीव निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश डॉ.नितीन राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 
    राज्य शासनाच्या कृषी वीज धोरणानुसार कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीतील ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत स्तरावरच विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांत कृषिपंपांचे वीजबिल भरण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. त्यातून वसूल होणाऱ्या रकमेतून उर्वरित प्रलंबित कामे करावीत. कृषिपंपांच्या प्रलंबित जोडण्या तातडीने द्याव्यात, असे निर्देशही ऊर्जामंत्री राऊत यांनी दिले.  या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (मानव संसाधन) डॉ.नरेश गिते व मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे उपस्थित होते. तर औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, औरंगाबाद ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली हे आभासी पध्दतीने उपस्थित होते.