घाटीत मल्टीलेव्हल पार्किंग व खेळाच्या मैदान बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्या

आ.सतीश चव्हाण यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे मागणी

औरंगाबाद,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-औरंगबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) या संस्थेत मल्टीलेव्हल पार्किंग व विद्यार्थ्यांकरिता खेळाचे मैदान बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

Displaying LETTER.jpg

    आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि.9) मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. गोरगरीब रूग्णांसाठी महत्वाचा आधार म्हणून घाटीला ओळखले जाते. याठिकाणी मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील 9 ते 10 जिल्ह्यातील रूग्ण उपचारासाठी येतात. रूग्णांसोबत त्यांचे नातेवाईक व रूग्णांना घेऊन येणारी वाहने देखील रूग्णालय परिसरात असतात. ती वाहने रूग्णालयाच्या परिसरात इतरत्र उभी केली जात असल्याने परिसरात अडचणी निर्माण होत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी अमित देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच सदर महाविद्यालय व रूग्णालयात एम.बी.बी.एस., एम.डी., बी.पी.एम.टी व इतर शैक्षणिक अभ्यासक‘माचे एकुण 1000 विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर खेळ व तत्सम कृती गरजेचे असल्याने याठिकाणी खेळाच्या मैदानाची देखील आवश्यकता असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्यावतीने मल्टीलेव्हल पार्किंग व विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानाकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांनी सदरील कामासाठी आराखडा तयार करून त्या कामासाठी लागणार्‍या खर्चाचे अंदाज पत्रक तयार करून दिले आहे. त्यानुसार मल्टीलेव्हल पार्किंगसाठी रू.40,26,05,065 तर खेळाच्या मैदानासाठी रू.02,27,70,000 इतक्या रक्कमेचा प्रस्ताव सादर केलेला आहे. सदरील अंदाजपत्रकानुसार प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ.सतीश चव्हाण यांनी अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.