तरुणावर तलवार आणि चाकूने वार :पुंडलिकनगर पोलिसांनी पाच जणांच्‍या आवळल्या मुसक्या

औरंगाबाद,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- गुटखा, तंबाखू फुकटात देत नसल्याच्‍या कारणावरुन किराणा दुकान आणि घराच्‍या दरवाजाला लाथा मारुन, आईला धमकी दिल्याप्रकरणी समजावून सांगण्‍यासाठी गेलेल्या तरुणावर तलवार आणि चाकूने वार करुन जीवे मारण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला.या  प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी रविवारी रात्री पाच जणांच्‍या मुसक्या आवळल्या. पाचही आरोपींना १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी सोमवारी दिले.

आतिष भाऊसाहेब मोरे (२०, भारतनगर, गल्‍ली क्र. ८, गारखेडा), शुभम संजय मोरे (२२, रेणुका नगर, जय अंबिका शाळेजवळ, गारखेडा), साईनाथ ऊर्फ पिण्या ऊर्फ प्रतीक गणेश खडके (१८, भारतनगर, गल्ली क्र.४), शेख बादशाहा शेख बाबा (२२, रा. रेणूकानगर, महादेव मंदिराजवळ, गारखेडा), यश संजय पाखरे (१९, रेणूकानगर, गारखेडा) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात गंभीर जमखी शुभम विनायक मनगटे (२४, रा. साईनगर, शिवाजीनगर) याने फिर्याद दिली. त्‍फिर्यादी हा सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. मनगटे कुटुंबांचे घरात किराणा दुकान आहे. शुभम हा मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी बायपास परिसरात गेला असता त्याला त्‍याच्‍या भावाने फोन करुन दुकान व घराच्‍या दरवाज्यावर तरुणांनी लाथा घातल्याचे सांगितले. फिर्यादी हा घरी आला असता, यश पाखरे व त्‍याच्‍या सोबतच्‍या दोन तीन मुलांनी दुकान व घरालाच्‍या दरवाजाला लाथा मारुन, तंबाखू व गुटखा द्या असे म्हणत होते. आठ ते दहा दिवसांपूर्वी देखील यश पाखरे व त्‍याचे साथीदार दुकानावर आले होते. त्‍यांनी तुबाखू व गुटखा फुकटात न दिल्याने शिवीगाळ करुन बघुन घेण्‍याची धमकी दिली होती, अशी माहिती फिर्यादीच्‍या आईने फिर्यादीला सांगितली.

फिर्यादी हा आरोपींना समजाविण्‍याच्‍या उद्देशाने यश पाखरेचा मावस भाऊ राजू पठाडे याच्‍याकडे गेला होता. त्‍यावेळी वरील आरोपी तेथे आले. त्‍यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन काठ्यांनी जबर मारहाण केली. तर आरोपी यश पाखरेने फायटरने, शुभम मोरे याने चाकूने तर राजू पठाडे याने तलवारीने फिर्यादीवर वार करुन जीवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पाचही आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी आरोपींनी गुन्‍ह्यात वापरलेले फायटर, चाकू, तलवार, काठ्या, दुचाकी आणि कपडे जप्‍त करायचे आहे. आरोपींचे पसार साथीदार राजू पठाडे, नीलेश धस यांना अटक करयाची आहे. गुन्‍हा करण्‍यासाठी आरोपींना कोणी चिथावणी दिली होती काय याचा आणि आरोपींनी गुन्‍ह्यात वापरलेली शस्त्र कोठून व कोणाकडून आणली याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.