अपघातग्रस्तांवर वेळीच प्रथमाेपचार करुन जीव वाचविणारे खरे देवदूत – परिवहन मंत्री अनिल परब

मालेगाव,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. दुर्देवाने अपघातात जखमी झालेल्या माणसाचा जीव वाचविणे महत्वाचे असल्याने त्याक्षणी स्वत:चे कर्तत्व समजून प्रथमोपचार करणारे नागरिक हे खरे देवदूत असतात, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री  तथा  संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी  केले.

आज उप प्रादेशिक कार्यालयातर्फे मालेगाव येथे आयोजित अपघातातील जखमींवर उपाय, प्रथोपचार किटचे वाटप व प्रथमोपचार यासंबंधी प्रशिक्षणाचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मंत्री श्री. परब बोलत होते. या कार्यक्रमाला नाशिक विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव, मोटार वाहन निरीक्षक संदीप बोधले, पुनम पवार आदी अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगावच्या क्षेत्रातील 250 कि.मी. अंतरातील अपघात स्थळांजवळ असणारे हॉटेल चालक, मालक व इतर व्यवसायिकांना वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांमार्फत प्रथमोचार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीस अपघात घडल्यानंतर ‘गोल्डन हवर’  मध्ये  योग्य ती वैद्यकीय मदत मिळल्यास अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचविणे शक्य होईल.

पुढे बोलतांना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचा प्रवास सुखकर व सुरक्षित होण्यासाठी परिवहन विभाग जबाबदारीने प्रयत्नशील असतो. रस्त्यांवरील अपघात स्थळांचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक यांनी एकत्रितपणे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण केले आहे. अशा सर्वेक्षणामुळे अपघात स्थळांची माहिती मिळाल्याने अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केला.

परिवहन मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्या हस्ते अपघात माहिती फलकाचे अनावरण

अपग्रस्तांना रुग्णवाहिका व रुग्णालयांचा संपर्क क्रमांकांची माहिती वेळेत मिळण्यासाठी माहिती फलक लावण्यात येणार आहेत. त्या फलकांचे मंत्री अनिल परब यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच अपघातात  प्रसंगावधान राखून मदत करणाऱ्या आणि अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्या राहूल महाजन, गायत्री चव्हाण, विजय बटवाल, डॉ. विकास गुलेचा, वैभव वाघ, शाम बगदाणे आणि भुषण भामरे यांचा परिवहन मंत्री तथा संसदीय कार्येमंत्री अनिल परब यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

मालेगाव अपघात स्थळावरील ढाबे, पेट्रोलपंप आणि टायर दुकानांच्या मालकांना सुप्रीम कोविड सेंटरच्या डॉक्टरांकडून मोफत प्रथमोपचार किट पुरविण्यात आले आहे. या प्रथोपचार किटचे वाटप परिवहन मंत्री श्री. परब यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

उप प्रादेशिक कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक यांनी संयुक्तरित्या ड्रोनद्वारे टेहरे, मुंगसे फाटा, वाके, चिंचवे फाटा, उमराणे फाटा, सवंद गाव व चाळीसगाव फाटा, तसेच स्टार हॉटेलजवळ, चिराई बारी, सावकी फाटा, भाबड फाटा आणि राहुड घाट याअपघात स्थळांचे सर्वेक्षण केले आहे. याबाबतची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी  चित्रीफितीद्वारे प्रास्ताविकात दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक संदीप बोधले यांनी केले तर आभारप्रर्दशन पुनम  पवार यांनी केले.