‘मेरी आवाज ही, पहचान है… या स्वरमय सूरांनी दिला लतादीदींना अखेरचा निरोप’

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई,६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज़ ही, पहचान है, गर याद रहे,  या संगीतमय धूनीच्या स्वरमय वातावरणात स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Image

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला शासकीय व लष्करी इतमामात, मंत्रोच्चारात अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरींची सलामी देऊन जवानांनी यावेळी मानवंदना दिली.

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वतीने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी  पुष्पचक्र अर्पण केले.

Image
Image

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,रश्मी ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पियूष गोयल, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल देसाई, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,आमदार सुनील प्रभू,मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,मिलिंद नार्वेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह-चहल, तसेच लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील  ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर,भारतरत्न सचिन तेंडुलकर, लेखक-गीतकार जावेद अख्तर, गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेता शाहरुख खान,अमीर खान, रणबीर कपूर,गायक शंकर महादेवन, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, भारतरत्न लता मंगेशकर यांचे असंख्य चाहते, चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थितांनी आदरांजली वाहिली.

 त्यांच्या राहत्या घरी प्रभुकुंज येथून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान पर्यंत फुलांनी सजलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेसोबत त्यांचे निकटवर्तीय होते. भारतरत्न लता मंगेशकर यांचे असंख्य चाहते उपस्थित होते, यावेळी अनेकांना लतादीदींना निरोप देताना अश्रू अनावर झाले होते.

जगप्रसिद्ध पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्या ब्रीच कँडी इस्पितळात उपचार घेत होत्या. कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने त्यांना तातडीने इस्पितळात हलवण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांची कृत्रिम श्वसनयंत्रणा काढण्यात आली होती. मात्र, आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना पुन्हा कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. अखेर आज सकाळी ८ वाजून  १२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये झाली होती आणि त्यांची कारकीर्द आठ दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांची गाणी तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे.

लता दीदींना २००१ साली संगीत क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लता दीदींना पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसह असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. १९९२ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकारनेही १९८४ सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. जी अविरत सुरू आहे.

लता दीदींच्या आयुष्याचा प्रवास जरी आज थांबला असला तरी दैवी सूरांमधून व सुमधुर आवाजातून भारतीयांच्या अंतकरणात लता दीदींनी लावलेला स्नेहदीप सदैव चैतन्याने त्या आठवणींना उजाळा देत राहतील.