प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिवंगत ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिवंगत ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले

मुंबई, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिवंगत ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण  करून त्यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील लता मंगेशकर  यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन आपली श्रद्धांजली वाहिली.

भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज-पंतप्रधान नरेंद्र मोदी

Image

महान गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून शोकभावना व्यक्त केल्या. पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या सुमधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज म्हणून कायम स्मरणात ठेवतील.

Image

ट्विटच्या शृंखलेत पंतप्रधान म्हणाले;

“मी या दुःखाला शब्दात व्यक्त करू शकत नाही. कनवाळू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरली जाऊ शकत नाही. आगामी पिढ्या त्यांना  भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज म्हणून कायम स्मरणात ठेवतील. त्यांच्या सुमधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती.”

Image

“लता दीदींच्या गाण्यांमध्ये विविध प्रकारच्या भावना होत्या. त्यांनी अनेक दशकांपासून भारतीय चित्रपट जगतातील स्थित्यंतरे जवळून पाहिली. चित्रपटांच्या पलीकडे, त्या  नेहमीच भारताच्या विकासाबद्दल सजग होत्या. त्यांना  नेहमीच एक सामर्थ्यशाली आणि विकसित भारत पाहायचा होता.”

“लता दीदींकडून मला नेहमीच अपार स्नेह मिळाला हा मी माझा सन्मान समजतो. माझा त्यांच्याशी  झालेला संवाद अविस्मरणीय राहील. लता दीदींच्या निधनाबद्दल मी माझ्या देशवासीयांसह अत्यंत दुःखी आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून शोक संवेदना व्यक्त केल्या. ओम शांती.”