प्रोफेसर लता मंगेशकर

विजय पांढरीपांडे

ला जर कुणी विचारले, परमेश्वराच्या अस्तित्वाचे प्रूफ काय,तर माझे उत्तर असेल,लता मंगेशकर! आमच्या पिढीच्या जिविताचे सार्थक झाले,कारण आम्ही या मंगेशकर कुटुंबाच्या स्वरा बरोबर जगलो,वाढलो.आम्ही कली युगात नव्हे,स्वर लता युगात जगलो.आज दीदी गेल्या नंतर त्यांच्या गायनाचे वेगवेगळ्या अंगाने मूल्य मापन होईल.त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी विविध भाषांत गायिलेली हजारो गाणी, त्यांचे रेकॉर्डस, त्यांचे विविध किस्से,याचीही उजळणी होईल. ती पुनरावृत्ती इथे करायची नाहीय.पण आजच्या तरुण पिढीने या ऋषीतुल्य व्यक्तीमत्वा पासून काय शिकायला हवे,हे प्रामुख्याने सांगायचे आहे.

मी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे कुलगुरु असतानाच्या काळात(२०११-१४),एक दिवस आय बी एन लोकमत वाहिनीवर ग्रेट भेट या कार्यक्रमात निखिल वागळे यांनी घेतलेली लता दीदी ची दोन भागातली मुलाखत ऐकली. त्या मुलाखतीत निखिल वागळे यांनी लता दीदी ना प्रश्न विचारला “ तुम्ही गायिका झाल्या नसत्या तर तुम्हाला काय व्हायला आवडले असते?”

लतदीदींनी उत्तर दिले,” मला प्रोफेसर व्हायला आवडले असते.”

या उत्तराने मी भारावलो.सदगदित झालो.त्याच दिवशी लता दीदींना विद्यापीठाच्या लेटर हेडवर हस्तलिखित पत्र लिहिले.टाईप केलेले ऑफिशियल वाटले असते.म्हणून आदरा पोटी हाताने लिहिले.त्या एकपानी पत्रात त्यांना आमच्या विद्यापीठातील संगीत विभागात मानद अतिथी प्राध्यापक हे मानाचे पद स्वीकारावे अशी नम्र विनंती केली.त्यासाठी त्याच्या सर्व अटी मान्य करू असे आश्वासन दिले.कसेही करून लता दिदीची प्रोफेसर होण्याची इच्छा पूर्ण करावी हाच प्रामाणिक,विनम्र उद्देश या विनंती मागे होता.खरे तर यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या परवानगीची गरज होती.पण अशा चांगल्या प्रस्तावाला कुणी विरोध करणार नाही याची मला खात्री होती.हे पत्र मी स्पीड पोस्टने प्रभुकुंज मुंबई च्या पत्त्यावर पाठवले देखील.पण त्याचे उत्तर आले नाही.त्यामुळे ते मिळाले की नाही,उत्तर का आले नाही,हे मला कधीच कळले नाही.

त्यानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने निखिल वागळे विद्यापीठात आले असताना मी त्यांना हा किस्सा सांगितला.एव्हढेच नव्हे तर त्यांना त्या पत्राची एक प्रत दिली.जमल्यास त्यांनी प्रयत्न करावे,आम्ही दीदीची प्रोफेसर होण्याची इच्छा पूर्ण करू असे नम्रतेने सांगितले.त्याचेही पुढे काही झाले नाही.या लेखाला प्रोफेसर लता मंगेशकर हे शीर्षक देण्यामागे हे कारण आहे. असे म्हणतात की गेलेल्या व्यक्तीचा आत्मा काही दिवस आसमंतात असतो.लता दीदीं ची ईच्छा पूर्ण व्हावी हाच यामागचा विनम्र प्रामाणिक हेतू.. लतादीदी प्रोफेसर नसल्या तरी त्या सप्त सूर विद्यापीठाच्या कुलगुरु होत्या असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.स्वर सम्राज्ञी,गान कोकिळा,गान सरस्वती, भारतरत्न अशा अनेक उपाध्या त्यांच्या मागे सन्मानाने लावल्या गेल्या.पण त्यांना व्हायचे होते प्रोफेसर..शिक्षक.. तशाही त्या त्यांच्या नंतरच्या पिढी साठी सह गायकासाठी , वादक कलाकारासाठी शिक्षक,प्राध्यापक होत्याच! प्रोफेसर हा आजन्म विद्यार्थी असतो. दीदी या नम्र,शालीन,कलासक्त, सश्रद्ध,परिश्रम करणाऱ्या तपस्विनी शिष्य होत्या.

आजच्या तरुण पिढीने या गान तपस्विनी कडून खूप काही शिकण्या  सारखे आहे.आपण आपल्यावर कोसळलेल्या संकटाचे,गरिबीचे भांडवल करतो.पण लता दिदीवर लहान वयातच भावंडांची ,कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. त्या काळात त्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांची निष्ठा,शालीनता हे सारे विद्यार्थ्यांनी शिकण्यासारखे गुण.आज कुटुंबातली नाती गोती विभक्त होताना आपण बघतो.लता दीदी नी आपले कुटुंब तर एकत्र जोडून,जोपासून ठेवलेच,पण संगीत क्षेत्रातील प्रवासात ,सहवासात आलेल्या सह कलाकाराला, संगीतकाराला जिव्हाळ्याने ,प्रेमाने आपलेसे केले.त्यांना यश,प्रसिद्धी,मान सन्मान सहजासहजी मिळाले नाहीत.त्यामागे प्रचंड कष्ट,साधना,तपस्या होती.प्रारंभीचा काळ खाचखलग्याचा,धडपडीचा होता. त्या सर्वांवर दीदींनी मात केली.हिंदी,उर्दू चे उच्चारण शिकून घेतले. तासन तास रियाज केला. तंत्रज्ञान फारसे विकसित न झाल्याच्या त्या काळात अनेक टेक्स द्यावे लागायचे.अंगात ताप असताना देखील त्या गायल्या.आज आपण अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या कलाकाराचे नखरे बघतो.तेव्हा लता दीदी चे शालीन व्यक्तिमत्व, त्यांची जिद्द,साधना,तपस्या,हे सारे प्रकर्षाने जाणवते.

पर्फेकक्षन, क्वालिटी, डेडिकेशन,समर्पण,शालीनता या शब्दाचे अर्थ म्हणजे लता दीदी.या शब्दांना पर्याय म्हणजे त्यांचा स्वर.अगदी खेमचांद प्रकाश,गुलाम हैदर,नौशाद, खय्याम पासून तर रामलाल,उत्तमसिंग, ए आर रेहमान पर्यंत,दिग्गज संगीतकारासोबत, नूरजहाँ,शमशाद, पं भीमसेन पासून तर मुकेश,रफी,किशोर,हेमंत कुमार,पासून तर उदित नारायण, सोनू निगम,कुमार सानू पर्यंत,त्याच्या गायनाचा वाईड स्पेक्ट्रम थक्क करणारा आहे.इलेक्ट्रॉनिक्स मध्ये फ्रिकवेंसी स्पेक्ट्रम ची ब्यांड विडथ ही ओक्तेव मध्ये मोजतात.लता दीदी चा फ्रिकवेन्सी स्पेक्ट्रम किती ओक्तेव्ह चा होता परमेश्र्वरच जाणे!

लता दीदी अन् वाद हेही समीकरण होतेच.पण ते वाद गुणवत्तेसाठी होते.तत्वा साठी होते.लता आशा ,यात कोण श्रेष्ठ या वादात आम्ही तरुण वयात रात्री जागवल्या चे आठवते.लता दीदी चे,रफी,शंकर जयकिशन,सी रामचंद्र,याच्या बरोबरचे वाद सर्व श्रुत आहेत.पण कुणीही त्यांच्यावर शिंतोडे उडवले नाहीत.ही पेल्यातली वादळे उठली तात्पुरती, तशी शमली देखील आपोआप.त्यांनी आपल्या आवडत्या गायकाला श्रध्दांजली म्हणून सैगल ची गाणी देखील गायली.गेल्या वर्षात आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांचे व सैगलचे एकत्र गाणे मीडियावर गाजते आहे.लताच्या स्वराचा वाइड स्पेक्ट्रम म्हणजे काय,त्याचा प्रत्यय हे गाणे ऐकले की येतो.आजी पासून तर नाती पर्यंत तीन पिढ्यांच्या नायिकांना दीदी चा आवाज लाभला हे देखील आठवे आश्चर्य!

लता दीदी चे प्रारंभी चे शिक्षण वडिलांकडून झाले.पण वडिलांची नाट्य गीते मात्र त्यांनी गायिली नाहीत. ती आशाने ताकदीने गायिली.आमच्या लहान पणीच्या वादात हे नाट्य गीतांचे,अन् क्लबसौंग चे मुद्दे प्रामुख्याने यायचे.पण क्या करू राम मुझे बुढा मिल गया, सारखे गाणे त्यांनी इच्छा नसताना देखील,राज कपूर च्या आग्रहा खातर गायले..अन् हम भी कूछ कम नहीं हे ठणकावून सांगितले. लता- रोशन,लता मदन मोहन,लता खय्याम,लता हृदयनाथ,ही सगळी पी एच डी  प्रबंध साठी सखोल अभ्यासाची प्रकरण..साधारण ७३ साली त्यांनी खळे काका साठी गायिलेले अभंग ,मराठी भावगीते,हे देखील वेगळ्या संशोधन समीक्षेचे विषय!

रहे ना रहे हम, किंवा मेरी आवाज ही पेहचान है,वगैरे मनाला सांत्वनासाठी पुरेसे शब्द आहेत.पण प्रत्यक्ष लता दीदी नाही,तिचा गाता स्वर सोबतीला नाही,तर आता जगायचे कशाला हा माझ्या सारख्या पुढे प्रश्न आहे.लता दीदी च्या जाण्याने आजच्या उदयोन्मुख युवा पिढी पुढचा आदर्शा चा दीप स्तंभ लोप पावला आहे.स्वर विद्यापीठाचा प्रोफेसर नव्हे कुलपती काळाच्या पडद्याआड गेला आहे.आज खऱ्या अर्थाने स्वर सूर्याचा अस्त झाला आहे.प्रोफेसर लता मंगेशकर यांना सर्व शिष्याच्या वतीने विनम्र आदरांजली..

(​लेखक हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी​ठाचे ​माजी ​कुलगुरु​ आहेत.)​ ​