लतादीदींच्या निधनामुळे संगीताचा आवाज लोपला- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मुंबई,६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज संगीताचे सूर हरपले असून संगीताचा आवाज लोपला आहे, त्यामुळे प्रत्येक चाहता आज नि:शब्द आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

तीन पिढ्यांशी समरस झालेल्या लतादीदी या ईश्वराची देण होत्या, त्या पुन्हा होणे नाही. “मेरी आवाज ही पहचान है”, हे त्यांचे शब्द अजरामर ठरणार आहेत. संगीत क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या लतादीदींच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे असे सांगून मंत्री अशोक चव्हाण यांनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

एका सुरेल युगाचा अंत – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दु:खद निधनामुळे पार्श्वगायन आणि संगीत क्षेत्रातील एका सुरेल युगाचा अंत झाल्याची शोकसंवेदना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.

लतादीदींनी संगीत क्षेत्रातील आपल्या ७८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकाहून एक सरस अशी तब्बल २५ हजार अजरामर गाणी गायिली. केवळ मराठी वा हिंदीच  नव्हे तर जवळपास सर्वच प्रमुख भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन करून कोट्यवधी रसिकांना अलौकिक   स्वरानंद दिला!

‘ए मेरे वतन के लोगो..जरा आँख मे भर लो पाणी..हे त्यांचे सुमधूर गाणे ऐकून आजही देशवासियांच्या हृदयात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग पेटते.

लतादीदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर हे गाणे गायिले असता नेहरूजींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. लतादीदींच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची अपरिमीत हानी झाली असून जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दिवंगत लतादीदींना माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत  असून आपल्या अजरामर गाण्यांमधून लतादीदी रसिकांच्या हृदयात कायमच राहतील, अशा शब्दात डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भारतीय संगीताचं अपरिमित नुकसान – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय संगीताचं अपरिमित नुकसान झाले, या शब्दात  जगद्विख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

श्री. थोरात आपल्या शोकसंदेशात म्हणतात, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. त्यांनी आजीवन संगीताची साधना केली. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देखील प्रदान करण्यात आला होता. संगीत क्षेत्रात भारताचे नाव वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. संगीत साधनेतून जगभरात त्यांनी निर्माण केलेली कीर्ती त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम राहिल. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

भारतीय संगीताचे सप्तसूर हरपले – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची लतादीदींना आदरांजली

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचे सप्तसूर हरपले आहेत, अशा शोकभावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक चाहत्यांना संगीताचा आनंद देणाऱ्या लतादीदी संगीतातील एक युग होत्या. मराठी, हिंदी चित्रपट, भक्ती गीते आणि भावगीताला लतादीदींनी आपला अलौकिक ईश्वरी स्वर देऊन संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेले, असे श्री. जयंत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.     

लतादीदींनी सुमारे सात दशकाच्या संगीत कारकीर्दीत पाच पिढ्यांचे आपल्या स्वरमधुर आवाजाने मनोरंजन केले. त्यांच्या आवाजाने भक्तिगीत, भावगीत, मराठी, हिंदी चित्रपट आणि अनेक भाषांतील संगीतात अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या मधुर आवाजाने अनेक भारतीय नागरिकांच्या भावविश्वाला संगीत समृद्ध केले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला आहे, असे श्री जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.

लतादीदी भारतीय संगीताचा अजरामर स्वर – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली शोकभावना

आपल्या गान प्रतिभेने संपूर्ण संगीत जगताला मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन अत्यंत दु:खदायी आहे. लतादिदी या भारतीय संगीताचा अजरामर स्वर आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी शोक व्यक्त केला आहे.

लतादीदींच्या भावस्पर्शी आवाजाने संगीत रसिकांच्या अनेक पिढ्या न्हाऊन निघाल्या आहेत. प्रदीर्घ काळ पार्श्वगायन क्षेत्रावर त्यांची मोहिनी होती. यापुढेही दिदींचे रसिकांच्या हृदयातील स्थान अढळ राहील, असेही प्रा.वर्षा गायकवाड यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात पोकळी – राज्यमंत्री संजय बनसोडे यांची श्रद्धांजली

आपल्या सुमधुर आवाजाने कित्येक दशके संगीत विश्वाला मोहिनी घालणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शोक व्यक्त करून लतादिदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणतात, लता दिदींनी आपल्या अतुलनीय आवाजाने प्रत्येक भारतीयाच्या मनातील विविध भावभावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या निधनाने प्रत्येक चाहता आज नि:शब्द झाला आहे. देशवासियांच्या मनावरील त्यांचे साम्राज्य यापुढेही कायम राहील. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.