अवैध वाळू उपसा व वाहतूक ; वैजापूर तालुक्यातील शिवना व गोदावरी नदीपात्रावर ड्रोन कॅमेऱ्याने नजर

वैजापूर ,५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिवना व गोदावरी नदीपात्रातून वाळू तस्करांकडून होणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी महसूल विभागाने तंत्रज्ञानाची मदत घेतली. शिवना नदीपात्रावर ड्रोन कॅमेरे उडवून एक ते दोन किलोमीटर अंतरावरील हालचाली पथकाने टिपल्या.अवैध वाळू उपशावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

गेल्या एक-दीड वर्षांपासून जिल्ह्यातील वाळूपट्टयांचा  लिलाव झालेला नाही.त्यामुळे वाळू तस्करांकडून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात आहे.अवैध वाळू उपसा रोखण्यात महसूल व पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्यामुळे कडक उपाय योजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सूचित केले होते. त्यानुसार प्रभारी तहसीलदार महेंद्र गिरगे यांनी तालुक्यातील शिवना व गोदावरी नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरविले व गुरुवारी तालुक्यातील शिवना नदीपात्रात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले.

तहसीलदार महेंद्र गिरगे ,सुरक्षारक्षक आरेफ पठाण, कोतवाल जालिंदर वाघ, ड्रोन कॅमेरा ऑपरेटर यांच्या पथकाने तालुक्यातील लाखणी, मांडकी, जांबरखेडा परिसरात ड्रोन कॅमेरा उडवून शिवना नदीपात्राचे चित्रीकरण केले. महसूल प्रशासनाने अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्याचा निर्णय घेतल्यामुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.