एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार

मेरठ येथील एका टोल नाक्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना

मेरठ ,३ फेब्रुवारी:-ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी मेरठहून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. विशेष म्हणजे अज्ञात आरोपींनी ओवेसी यांच्या गाडीलाच लक्ष्य केलं होतं. या प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरु आहे. विशेष म्हणजे संबंधित घटनेचा आता लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.

टोल नाक्यावर त्यावेळी नेमकं काय घडलं हे जसच्या तसं तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. त्यावेळचा सीसीटीव्ही फुटेज आपल्याला त्या घटनेच्या अतिशय जवळ नेत आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं असेल याचा अंदाज या सीसीटीव्ही फुटेजमधून जाणवताना दिसत आहे.

हातात बंदूक घेऊन दोन जण कारवर गोळ्या झाडताना या व्हिडिओत दिसत आहे. मेरठ इथली प्रचारसभा आटपून परतत असताना हापुर जिल्ह्यातील  छिजारसी टोल नाक्यावर गोळीबार झाल्याची माहिती ओवेसी यांनी दिली आहे. 

हल्लेखोरांनी ओवेसींच्या ताफ्यावर गोळीबार केला आणि तिथून पळत गेले. धावत असताना एका हल्लेखोरला टोलनाक्यावरुन जाणाऱ्या एका दुसऱ्या कारचा धक्का लागून तो खाली पडल्याचंही या व्हिडिओत दिसत आहे. संबंधित घटनेचा जो व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये एक लाल रंगाच्या शर्टमधील मुलगा टोल नाक्यावर ओवेसी यांच्या गाडीच्या जवळून जातो. यावेळी त्याच्या हातात काहीतरी आहे. विशेष म्हणजे त्याचवेळी फायरिंगचा आवाज येतो. हल्लेखोर ओवेसींच्या गाडीवर गोळीबार करतात. त्यानंतर ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात. हल्ला करणारा तरुण किती वेगात पळाला ते व्हिडीओत स्पष्टपणे जाणवत आहे. त्याला पळताना बाजूने जाणारी कारही दिसली नाही. त्यामुळे त्याचा पाय त्या कारमध्ये जातो आणि तो खाली पडतो. तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाच्या शर्टातील एक तरुण समोरुन येतो. त्याच्या हातात बंदूक असते. तो ओवेसींच्या गाडीवर थेट गोळीबार करतो. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत हल्ला करणाऱ्या त्या दुसऱ्या तरुणाचा चेहराही दिसत आहे. त्यामुळे आता या हल्लेखोर तरुणांना पोलीस कधी पकडतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हल्लेखोरांना पकडल्यानंतरच या प्रकरणातील मास्टरमाईंडचं नाव समोर येईल. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

ओवेसी यांनी स्वत: ट्विट करुन या घटनेची माहिती आज दुपारी ट्विटरवर दिली होती. “काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार केला गेला. चार राउंड फायर झाल्या. ते तीन-चार लोकं होती. गोळीबार करुन सर्वजण पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली आहे. पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघून गेलो आहे. या घटनेमुळे आम्हाला सगळ्यांना धक्का बसला आहे”, असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

ओवेसी हे मेरठच्या किठौर येथील एका प्रचाराच्या कार्यक्रमानंतर दिल्लीच्या दिशेला जात होते. यादरम्यान छिजारसी टोल प्लाजाजवळ त्यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. घटनेनंतर अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

ओवेसींची एमआयएम पक्ष उत्तर प्रदेशात भागीदारी परिवर्तन मोर्चासोबत निवडणूक लढत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवेसी हे पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. या भागातील जिल्ह्यांमध्ये येत्या 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यासाठी आणि 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे या भागामध्ये सर्वच पक्षांकडून जोर लावला जात आहे. राज्यात एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी रंगली असताना ओवेसी यांच्या ताफ्यावर अशाप्रकारे गोळीबाराची घटना घडल्याने गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय.