संचारबंदीला औरंगाबाद नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
औरंगाबाद,१०जुलै :

करोनाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदीला औरंगाबादच्या नागरीकांनी शुक्रवारी (१० जुलै) अत्यंत कडकडीत संचारबंदी पाळून करोनाला हरवण्याचा निश्चय केला. संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद देत नागरीकांनी घरातच बसण्याचा निर्णय घेतला,

नागरीकांच्या या सहकार्यामुळे रस्त्यावर अत्यावश्यक सेवेंची वाहने वगळता केवळ पोलीस दिसत होते. संचारबंदीच्या निमित्याने गारखेडा भागात चौका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गजानन महाराज मंदिर चौक, जवाहरनगर पोलीस स्टेशनचा चौक, सुत गिरणी चौक आणि शिवाजीनगरचा चौक या सगळ्या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते.

सातारा परिसरात पिण्याचे पाणी जारद्वारे पुरविले जाते. पाणी पुरवठादारांनी सकाळी नऊपूर्वीच घरोघरी पाण्याचे जार पोहोचवले. त्यामुळे दिवसभर पाण्याच्या गाड्यांची वाहतूक थांबली होती. सर्वाधिक जड वाहतूक असलेला बीड बायपास शांत राहिला. वाहतुकीची परवानगी असलेल्या मोजक्याच वाहनांना प्रवेश देण्यात आला. देवळाई चौक येथे पोलिसांनी तपासणी नाका उभारला. साताऱ्याकडे येणारी वाहने दर्गा चौकात तपासण्यात आली. आवश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना जाण्याची परवानगी देण्यात आली. इतर नागरिकांना परत पाठवण्यात आले. तर काही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात

आली. औरंगाबाद शहरात सतरा पोलीस ठाण्या अंतर्गत सर्वच प्रमुख चौक तसेच अंतर्गत भागात देखील पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. येणारया जाणारे, दुचाकीस्वार, चारचाकी चालक, रिक्षाचालक प्रत्येकाला अडवण्यात येत होते. वाहनधारकाला बाहेर त्याचे ओळखपत्र, वाहनांची कागदपत्रे आदी तपासण्यात येत होती. पोलीसांना समाधानकारक वाटले तरच त्यांना सोडण्यात येत होते. पोलीसांनी केलेल्या या तपासणीमध्ये बहुतांशी वाहनधारक हे बँक कर्मचारी, सरकारी कर्मचारी कींवा हॉस्पीटलमध्ये जाणारे खासगी नागरीक असल्याचे प्रत्यक्ष घटनास्थळी दिसून आले.