अभिमन्यू खोतकर यांच्या पक्षकार्याची दखल, युवा सेनेच्या विभागीय सचिवपदी पदोन्नती

जालना ,३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- युवा सेनेचे राज्य विस्तारक युवा नेते अभिमन्यू अर्जुनराव खोतकर यांच्या पक्ष कार्याची दखल घेत त्यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य  ठाकरे आणि युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी ही नियुक्ती केली असून अभिमन्यू खोतकर यांच्या नियुक्तीमुळे युवा वर्गात चैतन्य निर्माण झाले आहे.

अभिमन्यू खोतकर यांची 2017-18 मध्ये महाराष्ट्र राज्य विस्तारक म्हणून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नियुक्ती केली होती. चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. या तीन जिल्ह्यांसह महाराष्ट्रभर दौरे काढून युवासेनेचे संघटन वाढविण्यासाठी अभिमन्यू खोतकर यांनी वरिष्ठ नेत्यांसोबत प्रयत्न केले. याशिवाय  जालना जिल्ह्यात कोरोना काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे घेतली. रोगप्रतिकारक औषधांचे मोफत वाटप केले. दीडशे क्विंटल मोसंबी मुंबईला रवाना केली. पक्षकार्य आणि समाजकार्य लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांनी अभिमन्यू खोतकर यांची विभागीय सचिव म्हणून नियुक्ती केली.

औरंगाबाद,जालनासह बीड, परभणी आणि हिंगोली या पाच मोठ्या जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे युवा वर्गात जल्लोष व्यक्त होत असून चैतन्य निर्माण झाले आहे. संघटनेत चांगले काम करणाऱ्यांची पक्षात दखल घेतली जाते असा आपला स्वतःचा अनुभव असल्याने  आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये तरुणांना स्थान मिळावे अशी आपण पक्षाकडे आग्रही मागणी करणार आहोत,  युवकच खरे देशाचे आधारस्तंभ असल्याचे मत नोंदवून अभिमन्यू खोतकर यांनी  उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे, वरून सरदेसाई यांचे आभार मानले आहेत.