ज्येष्ठ अभिनेते रमेश देव सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण गमावला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

मुंबई,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण आज गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एक उत्तम कलावंत म्हणून आयुष्यभर कलाक्षेत्राची सेवा केली.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा परवाच वाढदिवस होता. शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच त्यांचे आपल्यातून जाणे दुःखदायक आहे. रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. दोन्हीकडे आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहबंध होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती. चित्रपट सृष्टीत त्यांना आदराचे स्थान होते. देव कुटुंबीयांकडून कला क्षेत्राची अविरत सेवा सुरू आहे. दिवंगत रमेश देव हे कला क्षेत्रात दोन पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा आणि मार्गदर्शक असा दुवा होते. त्यांनी सदाबहार आणि मनस्वी कलाकार अशी प्रतिमा आयुष्यभर जपली. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही असे आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

“ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे.  देखणं व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या  हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.

रमेश देव यांच्या अभिनयानं मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचं काम रमेश देव यांनी केलं. सीमा आणि रमेश देव यांचं वास्तवातलं तसंच पडद्यावरचं दांपत्य जीवन महाराष्ट्रासाठी आदर्श होतं. त्यांच्या निधनाने एक महान कलावंत, आदर्श माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचं निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. रमेश देव यांच्या कुटुंबियांच्या, रसिक चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. रमेश देव साहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रध्दांजली वाहिली.

देखणा, शैलीदार अभिनेता काळाच्या पडद्याआड – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख

“ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटक्षेत्राने एक अत्यंत देखणा, शैलीदार अभिनेता गमावला आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“भारतीय चित्रपट सृष्टीत विशेषतः मराठी चित्रपट क्षेत्रात कृष्णधवल चित्रपटांपासून ते आजच्या जाहिराती आणि वेब माध्यमापर्यंत सर्व माध्यमांमध्ये रमेश देव यांनी अभिनेता म्हणून आपली छाप सोडली होती. हिंदी चित्रपटांतही त्यांनी विविध भूमिका साकारून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. निर्माता म्हणूनही त्यांनी दर्जेदार चित्रपट दिले. त्यांनी रंगभूमीवर अभिनेता आणि निर्माता म्हणून विशेष योगदान दिले होते. त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा, यांच्यासोबत पडद्यावरील त्यांची जोडी रसिकांना विशेष भावली. भरभरून जीवन जगणारे एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.