अर्थव्यवस्थेला गती, सर्व घटकांना दिलासादायक अर्थसंकल्प : राजेश राऊत

 जालना ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- कोरोना महामारी मुळे मंदीच्या सावटाखाली असलेल्या अर्थव्यवस्थेला गती प्रदान करतांनाच पेन्शन धारक, महिला, तरुण, शेती, शेतकरी, सहकार ,कॉर्पोरेट अशा सर्व घटकांसाठी दिलासादायक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी व्यक्त केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात  रेल्वेला गतीमान करण्याच्या दृष्टीने प्रत्येक भागातील प्रसिद्ध वस्तूंना प्रमोश  करण्यासाठी 400 वंदे  भारत रेल्वे सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.  देशात इंटरनेट सुविधा अधिक गतीमान व कार्यक्षम करण्यासाठी  5 जी सुविधेचा लाभ मिळणार असल्याने ही घोषणा देशाला  प्रगती कडे एक पाऊल पुढे घेऊन जाणारी आहे. असे राजेश राऊत यांनी नमूद केले. आगामी 2023 हे वर्ष भरड धान्याचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले, ज्या मुळे चालू रब्बी हंगामातील गहू व धान शेतकऱ्यांकडून सरकार खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल, एम .एस.पी .अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन लाख कोटी रुपये हस्तांतरित केले जाणार असून बळीराजाला सुगीचे दिवस येणार हे अर्थसंकल्पात अधोरेखित होते. असे राजेश राऊत यांनी सांगितले. तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने संकटात देशाला प्रगतीचे किरण दाखवणारा अर्थसंकल्प असल्याचा विश्वास राजेश राऊत यांनी व्यक्त केला.