विजय सिंघल : कसोटी काळातले सचोटीचे एक वर्ष

डॉ. मोहन दिवटे, लातूर

ज बरोबर एक वर्षापूर्वी वरिष्ठ सनदी अधिकारी श्री. विजय सिंघल यांनी महावितरणच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली. कोरोना काळ आणि या ना त्या अनेक कारणांनी महावितरणच्या बोकांडी ग्राहकांकडील वीजबिलांच्या थकबाकीचं आणि देणीदारांच्या देणींचं डोंगराएवढं ओझं होतं. थकबाकी आणि देणीदारांची देणी केवळ एवढाच हिशेब समोर होता, बाकी हाती काहीच नव्हतं. ते एक आव्हानच होतं. आव्हान साधं नव्हतं, कसोटीच्या काळातलं होतं. महावितरणच्या अस्तित्त्वाचं ते आव्हान श्री. विजय सिंघल यांनी  स्वीकारलं आणि सूक्ष्म व सक्षम नियोजनाच्या माध्यमातून अगदी सचोटीने कुठल्याही संकटावर मात करता येत असल्याचा धडाच त्यांनी विद्युत वितरण क्षेत्राला घालून दिला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महसुलाच्या संदर्भाने विद्युत क्षेत्रातला केवळ मार्चोत्सव मोडीत काढून नियमित महसूल संकलन आणि त्यातून नियमित ग्राहकसेवा व ग्राहक संतुष्टीला प्राधान्य देण्यात आले.  

आर्थिक विवंचनेत असलेल्या महावितरणच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता. अशा चोहोबाजूनी कोंडीत सापडलेल्या महावितरणला बाहेर काढण्यासाठी श्री. विजय सिंघल यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय व आश्वासक आहेत. अशा आर्थिक विवंचनेतून बाहेर काढत महावितरणला ऊर्जितावस्थेच्या मार्गावर आणण्यासाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाचाही भक्कम पाठिंबा राहिला. याचा इथे संदर्भ यासाठी की, विजय सिंघल यानी अत्यंत अडचणीच्या काळात म्हणजे एक फेब्रुवारी रोजी महावितरणची धुरा स्वीकारली. त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. एक वर्षाच्या अत्यंत अवघड परिस्थितीच्या काळात त्यांनी महावितरणला शिस्त लावत बिघडलेली आर्थिक घडी सावरण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.   

श्री.विजय सिंघल हे अत्यंत शिस्तीचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त आणि ठाणे महानगरपालिकेत आयुक्त म्हणून प्रभावी काम केलेले आहे. 1997 च्या बॅचचे आयएएस असलेले श्री. विजय सिंघल हे आयआयटी रुरकी येथून स्थापत्य अभियांत्रिकीचे (बी.टेक.) (गोल्ड मेडल) पदवीधर आहेत. ते आयआयटी दिल्ली येथून बिल्डिंग सायन्स अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट शाखेचे (एम.टेक.) पदव्युत्तर पदवीधरही आहेत. जळगाव आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून प्रभावीपणे काम केलेल्या श्री. सिंघल यांना शहरी आणि ग्रामीण भागातील विविध समस्यांचा दांडगा अभ्यास आहे. शिवाय, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी संकटमोचक आणि आपत्तीनिवारक म्हणून विशेष कामगिरी केलेली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी असताना तिथे चक्रीवादळ, गारपीट, बर्ड फल्यू, चिकन गुनीया, स्वाईन फल्यू आदी समस्यांचा त्यांनी यशस्वी सामना केला. आपत्तीनिवारक अधिकारी म्हणून महाराष्ट्राला त्यांची वेगळी ओळख आहे.
    महावितरणमधीलही त्यांचे काम संकटमोचक आणि आपत्तीनिवारक म्हणूनच पुढे येत आहे. त्यांच्या पुढाकारातच महावितरणला आर्थिक स्थैर्यातून अस्तित्व जपण्याचा मार्ग मिळू शकतो. श्री. सिंघल यांना 2009 मध्ये जळगाव जिल्ह्यातील नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भाने लोकप्रशासनातील अत्यंत मानाचा असा ‘प्राईम मिनिस्टर अवॉर्ड फॉर एक्सलन्स’ हा पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आला. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. शिवाय, ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन येथे पार पडलेल्या इंटरलिंकिंग नदीजोड प्रकल्पाच्या नवव्या जागतिक परिसंवादात त्यांनी भाग घेतला होता. स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क व पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटी ऑफ यूएसए येथे ते नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भाने निमंत्रित होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत मुंबई शहराच्या स्वच्छतेसंदर्भांत क्लीनेस्ट स्टेट कॅपिटल इन इंडियाबाबतही पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले. राज्याचे साखर आयुक्त म्हणून काम करताना सर्वोत्कृष्ट ई-गव्हर्नन्स प्रकल्पाबाबत रौप्य आणि कांस्यपदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. 2018 मध्ये त्यांना डिजिटल इंडिया अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आलेले आहे. महावितरणला नुकतेच गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आले. त्याचेही श्रेय श्री. सिंघल यांच्याकडेच जाते.  

सध्या राज्यात महावितरणची आर्थिक स्थिती तोलामोलाची बनलेली आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या संदर्भाने लॉकडाऊनची मालिका लागली. त्यासह इतर या ना त्या अनेक कारणांनी वीजग्राहकांकडील थकबाकीत मोठी वाढ झाली. शिवाय, विविध विकास कामे आणि इतर अनुषंगिक कामाच्या संदर्भाने घेतलेल्या वित्तीय सहाय्याच्या बदल्यात महावितरणवरील कर्जाचा डोंगर वाढला. त्यातून त्यांनी अत्यंत सचोटीने मार्गक्रमण केले. त्यासाठी थकित बिलांची प्रभावीपणे वसुली वाढविणे, वीजहानी कमी करणे आणि वीज खरेदीमध्ये शक्य तितकी अधिक काटकसर करून महसुलाची बचत करण्याची त्रिसूत्री अवलंबिण्यात आली. या सूक्ष्म नियोजनामुळे  परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आल्याचे दिसून येते. याला सिंघल साहेबांची दूरदृष्टी आणि आपत्तीनिवारक म्हणून घेतलेली भूमिका कारण ठरल्याचे दिसून येते.   विद्युत क्षेत्रात परिस्थिती हाताबाहेर गेलेली असतानाही त्यांनी राज्यात कृषी ऊर्जा विकासासाठी पुरक धोरण राबविले. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कृषी ऊर्जा धोरण-2020 चे नियोजन केले. थकबाकीदार शेतकऱ्यांना सवलतीच्या मुशीतून थकबाकीमुक्त होण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली. वसूल होणाऱ्या निम्म्यासिम्म्या महसुलाचा शंभर टक्के हिस्सा कृषी आकस्मिक निधी उभारून शेतकऱ्यांच्या शिवारातच वीजविकासाची कामे करण्याची भूमिका स्वीकारली. मंत्रीमहोदयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यानी मूर्त स्वरूप दिल्याने कृषी ऊर्जा क्षेत्रात आश्वासक चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगली, अखंडित आणि शाश्वत विजेची सेवा मिळण्यास मदत मिळणार आहे.   

श्री. विजय सिंघल यांचा संकटमोचक आणि आपत्तीनिवारक व्यक्तिमत्त्व म्हणून संदर्भ देताना हीही बाब स्पष्ट करता येईल की, महावितरणची यंत्रणा ही कितीही आर्थिक संकटात असली तरी त्याची प्रत्यक्ष झळ महावितरणने ग्राहकाला कधीही लागू दिली नाही. मागील दोनेक वर्षापासून गंभीर आर्थिक संकट असतानाही राज्यातल्या कोणत्याही भागातील नागरिकांना अंधारात ठेवण्याची वेळ येऊ दिली नाही. विशेषत: गेल्या वर्षातल्या ऑक्टोबर महिन्यात देशात कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाली. राज्यात महावितरणला सुमारे 3300 पेक्षा अधिक मेगावॅट विजेच्या तुटीचा सामना करावा लागला. काही राज्यात विजेचे तात्पुरते भारनियमनही करावे लागले होते. परंतु, महाराष्ट्र सरकार आणि महावितरणने राज्यात कुठेही भारनियमन होऊ देण्याची नामुष्की येऊ दिली नाही. देशात इतर राज्यांची मागणी वाढल्याने खुल्या बाजारातील पॉवर एक्सचेंजमधील वीज खरेदीचे दर महाग होत गेले. अशा कठीण प्रसंगीही तब्बल 17 ते 18 हजार मेगावॅट विजेची मागणी असताना महावितरणला राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करावे लागले नाही.

महाराष्ट्राची ही कामगिरी इतर राज्यांच्या तुलनेत उल्लेखनीय आणि लक्षवेधी ठरली. शिवाय, राज्यात कोरोना महामारीच्या काळातच निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाने राज्याची दाणादाण उडवून दिली. त्याचा सर्वाधिक फटका वीज यंत्रणेला बसला. त्या कठीण प्रसंगातही अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांचे दशावधानी नेतृत्व सिद्ध पावले. त्यांना सर्व संचालक मंडळ, राज्यातील सर्व विद्युत अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पुरेशी साथ मिळाली. विद्युत वितरण क्षेत्रात ग्राहक समाधान महत्त्वाचे आहे. त्यासाठी वीज ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार, सुरळीत आणि सुरक्षित विजेची सेवा देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ग्राहकांना अचूक बिल देण्यासाठी आश्वासक व रचनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यातून भविष्यात त्यांच्या नेतृत्वात महावितरणसमोरील आव्हानांना समर्थपणे तोंड देणे सहज शक्य होईल व अस्तित्त्व  टिकविण्यापलीकडे जाऊन सुगीचे दिवस महावितरणच्या वाट्याला येतील, अशी महाराष्ट्राला आणि सबंध वीज कर्मचाऱ्यांना आशा आहे.