शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्या, भाजप खासदाराची मागणी

नांदेड,३० जानेवारी / प्रतिनिधी :- राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये नव्या वाईन विक्री धोरणाला परवानगी दिली आहे. नव्या वाईन पॉलिसीनुसार आता किराणा दुकान आणि शॉपिंग मॉलमध्ये वाईन विक्रीसाठी ठेवता येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यभरातून टीका होत आहे. आता या वादात नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील उडी घेतली आहे.सरकारला भिक लागली असेल तर त्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्यावी, अशी मागणी नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावरुन सरकारवर शरसंधान साधलं आहे. 

“शेतकऱ्याच्या उत्पन्नासह राज्याचा महसूल वाढवायचा असेल तर किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्री ऐवजी शेतकऱ्यांना गांजाची परवानगी द्यावी”, असं चिखलीकर म्हणाले. देगलूरमधील येरगी गावात पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचा सामूहिक कार्यक्रम ठेवण्यात आला. हा कार्यक्रम संपल्यानंतर खासदार चिखलीकरांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं.

दरम्यान द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा. सोबतच वाईन उद्योगाला चालना मिळावी, या उद्देशाने वाईन धोरण राबवण्यात येत असल्याचा सरकारचा दावा आहे. राज्य मंत्रिमंडळाची 27 जानेवारीला बैठक पार पडली. या बैठकीत  हा निर्णय घेतला गेला.