भारतीय जनता पक्ष जालना नगरपालिका एकतर्फी ताब्यात घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” मन की बात “कार्यक्रमाचे प्रत्येक वॉर्डात थेट प्रक्षेपण 

जालना ,३० जानेवारी /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी बकाल जालना शहरात विकासाची चाके फिरवत शहराचा चौफेर कायापालट केला असून विकासाच्या बळावर भारतीय जनता पक्ष  नगरपालिका एकतर्फी ताब्यात घेणार असल्याचा निर्धार भाजपाचे शहराध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी आज व्यक्त केला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” मन की बात ” ह्या कार्यक्रमाचे रविवारी भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेतर्फे शासकीय नियमांचे पालन करत प्रत्येक वॉर्डात थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
राजेश राऊत पुढे बोलतांना म्हणाले,आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे , जिल्हाध्यक्ष आ. संतोष पाटील दानवे, उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षातर्फे  निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक वॉर्डात व्युव्हरचना तयार करण्यात आली असून वॉर्डनिहाय बुथरचना पूर्ण झाली आहे तसेच शक्ती केंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे राजेश राऊत यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने मेक इन इंडिया, स्टार्ट अप, तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, अशा महत्वकांक्षी धोरणांतून उद्योग, व्यवसायांना चालना देत देशाचा जागतिक पातळीवर नावलौकिक वाढवला असून स्वातंत्र्यानंतर संवेदनशील असलेले कश्मीर, राम मंदिर असे विवाद देशाची एकता, अखंडता अबाधित ठेवून सामोपचाराने मिटवले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने देश स्वावलंबी झाला. असे नमूद करत राजेश राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सत्तेचा उपयोग शहराच्या विकासासाठी पुरेपूर केला असून पथदिव्यांसह चकचकीत वळण रस्ता, शहरातील प्रमुख रस्त्यांसह प्रत्येक वॉर्डात सिमेंट रस्ते, भुयारी गटार, नवीन व जूना जालन्यास जोडणारा लोखंडी पुलाच्या दोन्ही बाजूंनी दुरूस्ती साठी ना. दानवे यांनी निधी खेचून आणला. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या पथदिव्यांबाबत ना. दानवे यांनी योग्य तोडगा काढल्यावर शहर पुन्हा पथदिव्यांनी उजळून निघाले. शिवाय शहरातील सर्व जाती- धर्मियांची प्रार्थना स्थळे,सामाजिक सभागृहे, स्मशान भूमी, वाहतूकीसाठी जटील समस्या बनलेल्या रेल्वे स्थानकाजवळ भुयारी पुल, अशा पायाभूत सुविधांसाठी निधी मंजूर केला असल्याने शहरातील विकास कामे ही ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वानेच शक्य झाली असल्याचे सांगून जनशताब्दी, डेमू नंतर पुण्यासाठी नवीन रेल्वे जालनेकरांना मिळाली, प्रत्येक वॉर्डातील घरा- घरापर्यंत पदाधिकारी व कार्यकर्ते  हा विकास पोहोचवणार आहेत. ज्या मुळे स्वबळावर भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात नगर पालिका येईल. असा दुर्दम्य विश्वास ही राजेश राऊत यांनी शेवटी व्यक्त केला. मन की बात कार्यक्रमा निमित्त  गोपीकिशन नगर भागातील रमेश सेठी यांच्या  निवास स्थानी बैठक झाली.

या प्रसंगी रमेश शिंदे , मोतीलाल अग्रवाल, चमनलाल केलानी , नारायण दायमा, नरेश केलानी, राम जैस्वाल, दुर्गेश जुनगडे, सुनिल पिसे ,दिपक यादव, निलेश तलरेजा ,अरविंद यादव ,सचिन सेठी, रमेश कोठाळे, सुशील पारीख आदींची उपस्थिती होती.