औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज दोन सत्रात

औरंगाबाद,२९ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज शनिवारपासून दि.२९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान दोन सत्रात सुरु करण्यात आले. प्रथम सत्रातील न्यायालयीन कामकाज सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत तर दुसऱ्या सत्रातील कामकाज दुपारी दोन ते चार या वेळेत सुरु राहणार आहे. या दरम्यान कार्यालयीन कामकाज सकाळी साडेदहा ते साडेचार वाजेपर्यंत असणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २०२०-२१ मध्ये न्यायालयाच्या कामकाजाची वेळ आणि कर्मचारी संख्या कमी करण्यात आली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयीन कामकाज पूर्णत: मर्यादित करण्यावर भर दिला गेला होता. उच्च न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या सूचना व मार्गर्शक प्रणालीची अंमलबजावणी करत न्यायालयीन कामकाज तीन तासांवर तर न्यायालयीन कार्यालयीन कामकाज चार तासांपुरते करण्यात आले होते. पक्षकार व वकिलांनाही न्यायालयात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना न्‍यायालयाचे संपूर्ण कामकाज सुरळीत झाले होते. मात्र पुन्‍हा कोरोनाच्‍या ओमीक्रॉम या नव्‍याप प्रकाराणे रौद्ररुप धारण केल्याने पुन्‍हा न्‍यायालयाचे कामकाज सकाळी दहा ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते चार या दोन सत्रात चालणार आहे. या सत्रात केवळ तातडीच्‍या प्रकरणांसह रिमांड, जामीन आणि बंदिस्त आरोपी संबंधीची प्रकरणे चालणार आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमूख न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी काढले आहेत.