बदनापुर तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी द्यावा:पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कडे भाऊसाहेब घुगे यांची मागणी

जालना ,२९ जानेवारी /प्रतिनिधी :- बदनापूर तालुक्यातील ‘ क’ वर्ग दर्जाच्या ग्रामीण तिर्थक्षेत्र असलेल्या पर्यटनस्थळांना प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Displaying 1643460458846.jpg


ठाकरे हे औरंगाबाद येथे आले असता युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी त्यांची भेट घेऊन बदनापुर तालुक्यातील ग्रामीण तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांना  विकासाच्या दृष्टीने चालना मिळावी, रोजगार निर्मिती, विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी  सविस्तर चर्चा करून विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिले.

या वेळी युवा सेना जिल्हा समन्वयक भरत सांबरे, अंकुश पाचफुले, रामेश्वर दराडे यांची उपस्थिती होती. बदनापूर तालुक्यात रेणुकामातेचे ठाणे असलेल्या सोमठाणा येथील रेणुका माता संस्थान, भराडखेडा येथील शनिमहाराज देवस्थान, वनदेव संस्थान  (कंडारी),महादेव मंदिर कमलेश्वर( कळंबेश्वर), टेंभी आई माता मंदिर ( हिवरा राळा), तात्या महाराज मठ वाल्मिक ऋषी संस्थान ( अकोला), या क वर्ग तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांना प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून निधी मिळाल्यास येथे भक्त निवास, सामाजिक सभागृहे, स्वयंपाक गृह, बगीचा, घाट बांधकाम, सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, भूमीगत नाले, प्रवेशद्वार सुशोभीकरण आदी विकास कामे पूर्ण होऊन भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. परिणामी दुर्गम भागात तीर्थक्षेत्रे भाविकांनी गजबजून जातील. ज्या मुळे मोठ्या प्रमाणात उलाढाल होऊन रोजगार निर्मिती वाढेल. असे नमूद करत भाऊसाहेब घुगे यांनी ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांचा कायापालट करण्यासाठी  विकास योजनांतून प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा. अशा आग्रही मागण्या भाऊसाहेब घुगे यांनी केल्या. आदित्य ठाकरे यांनी सर्व मागण्या समजून घेत दुर्गम भागात पर्यटन स्थळ विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची हमी दिली.