बनावट कागदपत्रे व जमीन हस्तांतर केल्या बद्दल महाराष्ट्र ग्रामीण बँकेने केला कर्जदारावर फौजदारी गुन्हा दाखल

जालना ,२९ जानेवारी /प्रतिनिधी :- महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मंठा मार्फत सुनील सीताराम केंधळे , भारत सीताराम केंधळे,चंद्रकांत सीताराम केंधळे, अंजली सुनील केंधळे, लीलावती सीताराम केंधळे, मंगल पंजाब केंधळे व पंजाब सीताराम केंधळे रा केंधळे पोखरी , मंठा जि जालना यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे जून ते सप्टेबर २०१० दरम्यान शेत जमिनीच्या बोगस ७/१२ उतारे व फेरफार नकला देत बँकेच्या मंठा शाखेची फसवणूक केली आहे .हे सर्व जण संयुक्त कुटुंबातील असून त्यांनी जमीनच्या बोगस कागदपत्राच्या आधारे बँकेची एकूण रु ४९९८४१५/- रक्कमेची फसवणूक केली आहे. 

वसुलीसाठी बँकेने पाठपुरावा सुरु केल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी सदरील कुटुंबाच्या तारण जमिनीचा शोध घेतला असता ही  फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे  . त्यामुळे बँक शाखा व्यवस्थापक यांनी दिनांक २९/०१/२०२१ रोजी मंठा पोलीस स्टेशन मध्ये या सर्वाविरूध्द  भा.दं सं ४२०,४६५,४६७,४६८,४७१,३४ अन्वये फसवणूक , कागदपत्रात फेरफार करणे , त्या बनावट कागदपत्राच्या आधारे रक्कम हडप करणे , बनावट कागदपत्रे खरी आहेत असे भासवून कर्ज रक्कम उचलणे आदि गुन्हे यामधील सर्वजणाविरुद्ध दाखल केले आहेत . खरेतर महाराष्ट्र ग्रामीण बँक शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात नेहमी अग्रेसर राहिली आहे पण काही शेतकरी जाणूनबुजून बँकेची फसवणूक करून तारण जमिनीची विक्री किवा फेरफार करून अथवा बोगस कागदपत्राच्या आधारे कर्ज उचलून ते थकीत ठेवून बँकेची व शासनाची फसवणूक करतात त्याच्यासाठी ही  मोठी चेतावणी आहे . कोणत्याही शेत जमिनीवर कर्ज घेतल्या नंतर कर्ज परतफेड करे पर्यत ७/१२ फेरफार करता येत नाही तसेच तारण जमीन विकता येत नाही परंतु समाजातील काही अपप्रवृतीचे  लोक सर्रास अशा बाबीचा दुरुपयोग करीत असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले असून अशा अपप्रवृतीच्या लोकांविरुद्ध बँक फौजदारी खटले दाखल करणार आहे. 

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने नुकतीच महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना (एमबीटीवाय) आणून थकीत शेतकरी कर्जदारांना सुलभ व व्याजात सवलत देऊन  कर्ज परतफेड करून पुन्हा कर्ज देणारी योजना कार्यान्वित केली आहे . त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी बँक जन संपर्क अभियान राबवीत आहे . महाग्रामीण बळीराजा तारणहार योजनेचा फायदा घेत शेतकरी बांधवांनी आपले थकीत कर्ज नियमित करून घ्यावे असे आवाहन बँकेने शेतकरी बांधवाना केले आहे.