शाळांमधून महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर–शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध शैक्षणिक कार्यक्रम, व्याख्यानाचे आयोजन करावे 

मुंबई,२८जानेवारी / प्रतिनिधी :- महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील शाळांमधून विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर तसेच गांधी विचार हा भारतीय विचार व्हावा असा संदेश देणारे करिअर कौन्सिलर आशुतोष शिर्के यांचे महात्मा गांधी यांचे जीवन आणि विचार या विषयावर सकाळी 11 वाजता यु ट्यूबच्या माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. https://youtu.be/eKc8s4rZei4  या लिंकवर हे व्याख्यान ऐकता येणार असून विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे. असे म्हणत ‘नयी तालीम’च्या रूपाने देशाला शिक्षणाची अनोखी देणगी देणाऱ्या महात्मा गांधींयांचा 30 जानेवारी हा स्मृतिदिन यानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या मन, मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा आणि शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांमध्ये रूजवावा यासाठी 30 जानेवारी 2022 या हुतात्मादिनी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

गांधीजींची शिक्षणविषयक स्वतंत्र भूमिका होती. त्यांनी संपूर्ण जीवनात आपल्या आचार आणि विचारांतून दिलेले संदेश एकविसाव्या शतकातही महत्त्वपूर्ण आहेत. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना व नव्या पिढीला महात्मा गांधीजींच्या विचारांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार असल्याचेही असेही प्रा.गायकवाड यांनी म्हटले आहे.

सर्व शाळांमध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन सर्व सहभागी घटकांमार्फत आपले घर व परिसराची स्वच्छता करण्यात येईल. पहिली ते पाचवी इयत्तेमध्ये महात्मा गांधींच्या आवडीच्या प्रार्थना/ भजन यांचे गायन आणि वेशभूषेसह एकपात्री अभिनय आयोजित करण्यात येईल तसेच घरातील स्वत:ची कामे स्वत: करून दिवसभरातील उत्कृष्ट कृतीचे सादरीकरण करण्यात येईल. सहावी ते आठवी इयत्तेमध्ये सत्कृत्य हा उपक्रम राबविण्यात येऊन त्याअंतर्गत केलेल्या चांगल्या कामांचा दोन मिनिटांचा व्हीडिओ अपलोड करण्यात येईल. तर, नववी ते बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांमार्फत स्वत:ची आवड/ छंद याचा विचार करून एका हस्त उद्योगाची माहिती घेऊन दोन मिनिटांचे व्हीडिओ अपलोड करण्यात येतील. शाळास्तरावर, तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर मातृभाषेतून शिक्षण आणि अहिंसा या विषयांवर परिसंवाद, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येतील. यामध्ये अहिंसात्मक वृत्ती काळाची गरज,  उचललेस तू मीठ मुठभरी साम्राज्याचा खचला पाया, चलेजाव चळवळ आदी विषयांचा समावेश असेल.

विद्यार्थी व शिक्षकांनी वरीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या सादरीकरणाचा 2 ते 3 मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजसंपर्क माध्यमावर (फेसबुक ट्विटर, इन्स्टाग्राम) #naitalim 2022 या हॅशटॅग (#) चा वापर करून अपलोड करण्यात यावे व त्या पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in/competitions/ इथे देण्यात यावी, असे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी आपल्या स्तरावरून आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात. कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना कोविड-19 बाबत वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.