अवैधरित्या एलपीजी गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

जालना सदर बाजार पोलिस ठाण्याच्या पथकाने ही केली कामगिरी

जालना ,२८ जानेवारी /प्रतिनिधी :- धोकादायक पध्दतीने अवैधरित्या एलपीजी गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत  सदर बाजार पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन काकरवाल यांच्यासह पथकाने ही  कामगिरी केली आहे.स्वयंपाकाचा गॅस वाहनात भरण्याचे अवैध प्रकार वाढल्याने ही  कारवाई पोलिसांनी केली.
जालना शहरातील लक्कडकोट भागातील कुंडलिका नदीतीरी एका टिनपत्राच्या शेडमध्ये स्वयंपाकाचा गॅस काढून तो वाहनांमध्ये धोकादायक आणि अवैधरित्या सर्रास भरण्यात येत होता.याबाबत माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन आणि उपनिरीक्षक नितीन काकरवाल यांनी पोलिस पथकासह काल रात्री अचानक छापा मारला.यावेळी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधून गॅस धोकादायक पद्धतीने बाहेर काढून तो वाहनांमध्ये सर्रास भरण्यात येत होता. यावेळी अवैधरित्या गॅस भरत असताना दोन जणांना पोलिसांनी जागेवर ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी एक ऑटोरिक्षा, भारत गॅसच्या तीन सिलेंडर टाक्या, इंडेन गॅसची एक टाकी, विद्युत व इन्व्हर्टरवर चालणाऱ्या मोटारी, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, गॅस वाहनात भरण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, असा 1 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी  शेख सद्दाम शेख आयुब (रा. माळीपुरा) आणि रिक्षाचालक अमीन अय्याज बेग(रा. चंदनझिरा) या दोन जणांविरुद्ध भादंवि. 286 आणि जीवनावश्यक कायद्याच्या 3 व 7 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कामगिरी सदर बाजार पोलिस ठाण्याचे ज्ञानेश्वर पायघन, नितीन काकरवाल, कैलास खार्डे, अमोल हिवाळे, राजू वाघमारे यांनी केली आहे.