जालना जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन रखडले

जालना ,२८ जानेवारी /प्रतिनिधी :- जालना जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून  वेतन रखडले असून या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. रखडलेले वेतन तात्काळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे अशी मागणी जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फकीरा वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जि. प. उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रसाळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाणी पुरवठा विभागातील हातपंप दुरूस्ती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे शासनाकडुन मासिक वेतन भते तसेच सेवानिवृत्ती वेतन व अर्थक लाभासाठी अनुदान दिल्या जात नसून जिल्हा परिषदांची स्थिती पाहून शासनाने सदरील कर्मचारी यांचे वेतन सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती विषयक लाभ यासाठी हातपंप, विजपंप वर्गणी वसुलीसह केंद्र व राज्य पुरस्कृत योजना निधीमधुन 15 टक्के व जिल्हा परिषद उपकराचे 20 टक्के  रक्कम सदरील कर्मचारी वेतन भत्ते व सेवानिवृत्ती वेतन यासाठी ठेवण्याचे आदेश दिलेले असताना जिल्हा परिषद फक्त हातपंप, विजपंप वर्गणी वसुलीवर अवलंबुन ठेवते. जिल्हा परिषदेच्या उदासिन धोरणामुळे सदरील पैसा तसाच पडुन आहे. त्यामळे शासन नियमांची वेळीच अंमलबजावणीही होत नाही.

जालना जिल्हा परिषद अंतर्गत आज रोजी 36 कर्मचारी हे सेवानिवृत्त होवून 2 ते 3 वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तरी अदयापही 15 कर्मचारी यांना कोणतेही सेवानिवृत्त विषयक लाभ देण्यात आलेले नाही. सेवानिवृत्तीचे आदेश काढुन कर्मचारी यांची बोळवन केलेली आहे. सद्यस्थितीत सेवानिवृत्त 36 कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर 2021 ते आजपर्यंत 31 जानेवारी पर्यंत सेवानिवृत्त वेतन देण्यात आलेले नाही. त्यामूळे सदर कर्मचारी व त्यांचे कुंटूबियांची उपासमारी होत आहे. आज दि. 28 रोजी जि. प. चे जिल्हा वित्त अधिकारी व कार्यकारी अभियंता डावखरे यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेवून या सर्व बाबींची चर्चा केली. चर्चाअंती दि. 10 फेब्रुवारी  रोजी वेतन देण्यात असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधुन समाधान व्यक्त करण्यात आले.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष एस. एस. जाधव, सचिव एस. टी. कार्लेकर, जिल्हा कार्याध्यक्ष एम. एम. देशमुख, जिल्हा कोषाध्यक्ष जि. एम. कांबळे, आर. ई. नेमाने, एम. आर. ढाकणे, एस. डी. शेळके, ए. पी. पोचदार, एस. बी. सारडा, एस. एस. पैठणकर, एस. टी. साळुंके, एस. टी. राठोड, निर्मल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.