अफगाणिस्तान मध्ये झालेल्या घटनाक्रमामुळे चिंतित-पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ,२७ जानेवारी / प्रतिनिधी :-प्रादेशिक सुरक्षेसंदर्भात आमच्या सर्वांच्या चिंता आणि उद्देश एकसारखे आहेत. अफगाणिस्तान मध्ये झालेल्या घटनाक्रमामुळे आपण सगळेच चिंतित आहोत असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. 

त्यांचे भाषण जसेच्या तसे :

भारत- मध्य आशिया शिखर संमेलनाच्या पहिल्या बैठकीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

भारत आणि मध्य आशिया देशांच्या राजनैतिक संबंधानी 30 वर्षांचा भरीव कार्यकाळ पूर्ण केला आहे.गेल्या तीन दशकातील आपल्या सहकार्यातून आपण कित्येक विषयात यशस्वी कामगिरी केली आहे.आणि आता, या महत्वाच्या टप्प्यावर आपल्याला येणाऱ्या काळासाठी देखील एक महत्वाकांक्षी दूरदृष्टीचा आराखडा निश्चित करायला हवा आहे.एक अशी दूरदृष्टी, एक असा आराखडा जो बदलत्या काळात आपल्या लोकांच्या, विशेषतः युवा पिढीच्या आकांक्षा पूर्ण करू शकेल.

महोदय,

द्वीपक्षीय स्तरावर भारताचे आपल्या सर्व आशियाशी देशांशी घनिष्ट संबंध आहेत.

महोदय,

भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी कज़ाकिस्तान भारताचा एक महत्वाचा भागीदार ठरला आहे. कज़ाकिस्तान मध्ये अलीकडेच झालेल्या जीवित आणि वित्तहानी बद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो.भारताच्या उज्बेकिस्तासोबतच्या वाढत्या सहकार्यात, आमची राज्ये देखील सक्रिय भागीदार आहेत. यात माझे राज्य गुजरातचाही समावेश आहे.कीर्गीस्तानसोबत आमचे शिक्षण आणि उच्च अक्षांश संशोधन क्षेत्रात सक्रिय भागीदारी आहे. तिथे अनेक भारतीय विद्यार्थी संशोधन करत आहेत. ताजीकिस्तान सोबत आमचे संरक्षण क्षेत्रात जुनेच सहकार्याचे संबंध आहेत. आणि आम्ही हे संबंध सातत्याने अधिकाधिक दृढ करत आहोत.प्रादेशिक दळणवळण क्षेत्रात, तुर्कमेनिस्तानसोबत भारताचे महत्वाचे संबंध आहेत, या संदर्भात अश्गाबात करारत आमची भागीदारी पुरेसी स्पष्ट आहे.

मान्यवर महोदय,

प्रादेशिक सुरक्षेसंदर्भात आमच्या सर्वांच्या चिंता आणि उद्देश एकसारखे आहेत. अफगाणिस्तान मध्ये झालेल्या घटनाक्रमामुळे आपण सगळेच चिंतित आहोत.या संदर्भात देखील आपल्यातले परस्पर सहकार्य, प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. 

मान्यवर महोदय,

आजच्या या शिखर परिषदेची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत.

पहिले, ही स्पष्ट करणे की प्रादेशिक सुरक्षा आणि समृद्धीसाठी, भारत आणि मध्य आशियातील परस्पर सहकार्य अनिवार्य आहे.

भारताच्या वतीने मला इथे स्पष्ट करायचे आहे की आमच्या व्यापक शेजारी प्रदेशाचे स्थैर्य आणि एकात्मिक दृष्टीकोनातून आखलेल्या धोरणाच्या केंद्रस्थानी मध्य आशिया आहे.

दुसरे उद्दिष्ट, आपल्या सहकार्याला एक प्रभावी संरचना, एक निश्चित आराखडा देणे हे आहे.

यामुळे विविध स्तरावर, आणि विविध हितसबंधी गटांमध्ये, नियमित संवादाची एक व्यवस्था निर्माण होईल.

आणि, तिसरे उद्दिष्ट, आपल्या सहकार्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार करायचा आहे.

त्या माध्यमातून, आपण येत्या तीस वर्षात, प्रादेशिक संपर्कव्यवस्था आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारू शकू.

मान्यवर महोदय,

पुन्हा एकदा भारत-मध्य आशिया शिखर संमेलनाच्या पहिल्या बैठकीत मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.