प्रत्येक नागरिकाने कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याबरोबरच कोव्हीड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे–पालकमंत्री राजेश टोपे

May be an image of 7 people, people riding horses, people standing and monument

जालना,२६ जानेवारी / प्रतिनिधी :-  जालना जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना बधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कवच कुंडलाची भूमिका बजावणाऱ्या लसीकरणाला प्रथम प्राधान्य देऊन प्रत्येक नागरिकाने कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याबरोबरच कोव्हीड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

May be an image of 3 people, people standing and sky

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर , माजी आमदार अरविंद चव्हाण , निसार देशमुख , पंडितराव भुतेकर ,बबलू चौधरी,जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल , जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, तहसिलदार संतोष गोरड, तहसिलदार संतोष पडघन, जिल्हा नियोजन अधिकारी सूनिल सुर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस, नायब तहसिलदार, विक्रांत मोंढे, नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

May be an image of 7 people, people standing and outdoors

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जालना जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अनेक उपाययोजना करण्याबरोबरच लसीकरणालाही गती देण्यात येत आहे. जिल्ह्यातील 83 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी लसीचा पहिला तर 53 टक्क्यापेक्षा अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणालाही सुरुवात करण्यात आली असून साठ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येत आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का अधिक प्रमाणात वाढण्यासाठी ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनी विनाविलंब दुसरा डोस घेण्याबरोबरच शासन, प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी केले.

May be an image of 4 people, people standing and outdoors

जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यावर सातत्याने भर देण्यात आला असल्याचे सांगत रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून सामान्य रुग्णालयात दुसऱ्या नवीन लिक्विड ऑक्सिजन टँकची उभारणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय राजूर, घनसावंगी व उपजिल्हा रुगणालय, अंबड येथे प्रत्येकी एक असे आतापर्यंत एकूण 5 लिक्विड ऑक्सिजन टँक्स उभारण्यात आले आहेत. भविष्यात जिल्हयातील रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा म्हणून आतापर्यंत सामान्य रुग्णालय, जालना येथे 2, महिला रुग्णालय, जालना, ग्रामीण रुग्णालय परतूर, राजूर व घनसावंगी, उपजिल्हा रूग्णालय, अंबड येथे प्रत्येकी एक असे एकूण 7 पीएसए प्लांट उभारलेआहेत. भविष्याचा विचार करुन लहान मुलांसाठी आयसीयुही तयार करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयाजवळ अमेरिका-इंडिया फाऊंडेशन यांच्या सहकार्याने अतिशय कमी कालावधीत 100 खाटांचे सर्व सुविधायुक्त अदयावत असे मेडीकॅब हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे हॉस्पिटल सुरळीत चालू राहण्यासाठी लागणारा निधीसुध्दा मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिली.

May be an image of 8 people, people standing and outdoors

मराठवाडयातील रुग्णांसाठी जालना येथे 365 खाटांचे विभागीय मनोरुग्णालय उभारण्याकरीता मान्यता मिळाली असून रूग्णालयाच्या बांधकामाचे नियोजन सुरु आहे. कर्करोग रुग्णांसाठी अदयावत किमोथेरेपी व रेडिएशन थेरपी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने टाटा कॅन्सर हॉस्पिटल, मुंबई यांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात लवकरच रेडिएशन ऑन्कॉलॉजी विभाग सुरु करण्यात येणार असूनआयुर्वेद उपचार पध्दतीचा रुग्णांना फायदा व्हावा या दृष्टीने आयुष रुग्णालय व आयुष वनोदयान निर्मितीचा संकल्प दृष्टीस ठेऊन याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. तीन एकर जागेची याकरीता उपलब्धता व ताबा मिळाला असल्याचेही पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील जनतेला आरोग्याच्या सेवा मोफत स्वरूपात मिळाव्यात यादृष्टीने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून राज्यातील साडेबारा कोटी जनतेसाठी 977 दुर्धर आजारावर दीड लक्ष रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराची सोय करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणालाही अधिक महत्त्व देण्यात येत असून शालेय मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्याकरीता जिल्हा परिषदेच्यावतीने एक हजार 480 शाळांमध्ये डिजीटल शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जात आहे. तसेच राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानातंर्गत जिल्हयातील निझामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती, पुनर्बांधणी केली जाणार आहे. या अंतर्गत जिल्हयातील 156 शाळांतील 332 निझामकालीन खोल्यांची पुर्नबांधणी होणार आहे. तर 177 शाळांची दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.

जालना जिल्ह्यास सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेसाठी 215 कोटी रुपयांचा नियतव्यय ठरवुन दिला होता. परंतु राज्यस्तरीय बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीमध्ये वाढ करत 275 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचेही पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत जालना जिल्ह्यातील 360 गावांची निवड करण्यात आली असून 265 कोटी रुपयांचे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून भरपाई म्हणून 108 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून फळबाग लागवडीबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून उपयुक्त असलेल्या रेशीम उद्योगालाही चालना देण्यात येत आहे. जालना येथे असलेल्या रेशीम कोष खरेदी विक्री केंद्राच्या माध्यमातून तीन हजार 678 शेतकऱ्यांनी 14 कोटी 47 लक्ष रुपये किमतीच्या 325 मेट्रिक टन रेशीम कोषांची खरेदी विक्री केली आहे. त्याचबरोबर गोरगरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी चा साडेसात लाख नागरिकांनी लाभ घेतला असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले. क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल, जालना व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल विकसीत करण्यात येत आहे. या क्रीडा संकुलांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाचे संकट निश्चितपणे जाईल, असा विश्वास व्यक्त करत कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही; परंतु कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी व सतर्कता बाळगण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले. यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.