वैजापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीस स्व.आर.एम वाणी यांचे नामकरण

वैजापूर ,२६ जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीस तालुक्याचे लोकनेते,माजी आमदार स्व.आर.एम.वाणी साहेब यांचे नाव आज देण्यात आले. आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर होते.

Displaying IMG-20220126-WA0190.jpg

सलग पंधरा वर्षे तालुक्याचे आमदार राहिलेले स्व.आर.एम. वाणी यांच्या व्यापक कल्पनेतून बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्वावर वैजापूर पंचायत समितीची व्यापारी संकुलासह प्रशासकीय इमारत उभी राहिली. तालुक्यात जलसंधारण योजना उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल पंचायत समितीला शासनाकडून मिळालेल्या बक्षिसाच्या 25 लक्ष रुपयांच्या निधीचे काय करावे असा प्रश्न त्यावेळी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना पडला होता. मिळालेल्या निधीचा उपयोग कसा करावा याची खलबते सुरू झाली. या रकमेची कामे काढून ती आपसांत वाटून घेण्याचा पंचायत समितीच्या सदस्यांचा मनसुबा होता.मात्र स्व.वाणी साहेब यांच्यामुळे त्यांचा मनसुबा उधळला गेला. स्व.आर.एम.वाणी यांनी बक्षिसाच्या रकमेतून पंचायत समितीची व्यापारी संकुलासह भव्य प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आणि स्व.वाणी साहेब यांच्या व्यापक दृष्टिकोनातून ही भव्य इमारत उभी राहिली.     

Displaying IMG-20220126-WA0188.jpg


आज प्रजासत्ताक दिनी  पंचायत समितीच्या या प्रशासकीय इमारतीचा नामकरण सोहळा आ.बोरणारे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी माजी आमदार सुभाष झांबड, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव,शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी हजर होते.