प्रजासत्ताक दिनानिमित्त औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

 जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ध्वजारोहणाचे थेट प्रक्षेपण

औरंगाबाद,२५ जानेवारी / प्रतिनिधी :- भारतीय प्रजासत्ताक  दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी  9.15 वाजता पोलीस आयुक्तालयाच्या ‘देवगिरी मैदानावर’ आयोजित करण्यात आला आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना हा समारंभ घरबसल्या पाहता यावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. थेट प्रेक्षपण पाहण्यासाठी https://www.facebook.com/AurangabadDIO/ किंवा https://www.facebook.com/mcnnews24/  या लिंकवर क्लिक करावे. तसेच मराठवाडा केबल नेटवर्कच्या चॅनेल क्रमांक 122 आणि 523 वर सुध्दा हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास सर्व प्रादेशिक अधिकारी  विभाग प्रमुख, जिल्हास्तरीय अधिकारी व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी राष्ट्रीय पोशाखात व कोविड-19 संदर्भातील शासनाकडून वेळोवेळी सामाजिक अंतर संदर्भात प्राप्त मार्गदर्शक सूचना आणि परिपत्रक मधील सूचना विचारात घेवून उपस्थित रहावे. ध्वजारोहण कार्यक्रमास निमंत्रितांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे.  त्याचबरोबर मास्क वापरणे अनिवार्य असून कार्यक्रमस्थळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.