क्रिकेट सामन्यावर सट्टा:नाशकातील तिघा आरोपींची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी

औरंगाबाद,२३ जानेवारी / प्रतिनिधी :- भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० क्रिकेट सामन्यावर फोन व्दारे पैसे लावुन, सट्टा खेळल्या प्रकरणात अटक करण्‍यात आलेल्या नाशकातील तिघा आरोपींची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी रविवारी दिले. सद्दाम झुल्फेकार शेख, अमित मदन बुऱ्हाडे  आणि अमोल कापडनीस (सर्व रा. एन-९ सी, तुळजा भवानी चौक, शिवाजी चौक जुना सिडको नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत.

गुन्‍ह्यात यापूर्वी तबरेज  खान, वसीम खान आणि आसेफ शेख या तिघांना अटक करुन त्‍यांच्‍या ताब्यातुन पाच मोबाइल, दोन दुचाकी आणि पाच हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा सुमारे एक लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तिघा आरोपींची पोलिस कोठडीनंतर न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे.

सायबर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन त्‍यांनी हर्सुल येथील मथुरा लॉन शेजारील मोकळ्या जागेवर छापा टाकून भारत विरुद्ध न्यूझीलंड  टी-२० क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या  आरोपींना अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत नाशिकच्या  आरोपींची नावे समोर आली. त्‍यानूसार पोलिसांनी  आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींच्‍या कोठडीची मुदत संपल्याने त्‍यांना रविवारी  न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, न्‍यायालयाने त्‍यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश दिले.