अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार कनिष्ठ अधिकार्‍यांकडे देणे ही गंभीर बाब

गृहमंत्र्याकडे सामाजिक कार्यकर्ते गणेश चांदोडे यांनी व्यक्त केली चिंता

जालना ,२२ जानेवारी /प्रतिनिधी :-अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार सरकारने कनिष्ठ अधिकार्‍याकडे दिले आहे. यामुळे समाजात भितीचे वातारण निर्माण होवून असुरक्षिततेची भावना निर्माण होईल. ही बाब गंभीर आहे. अशी खंत सामाजिक कार्यकर्ते  गणेश चांदोडे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र शासन गृह विभाग मंत्रालय यांच्या पत्रानुसार शासनाच्या विचाराधीन असलेल्या अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार निरीक्षक वर्ग गट अ व सहाय्यक पोलिस निरीक्षक गट ब दर्जाच्या अधिकार्‍यास प्रदान करण्यात आले आहे. तो अधिकार संबंधीतांना देवू नये तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करावा यासाठी शासनाने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत गृह मंत्र्याना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात महटले की, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे अधिकार कायद्याच्या तरतुदीनुसार डिवायएसपी किंवा गट अ वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तपास अधिकार असतात मात्र विधि व न्याय विभागाच्या सहमतीने गृह विभागाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार कनिष्ठ अधिकार्‍यांना देण्याचे ठरवले आहे. त्या संदर्भात दिनांक 10 जानेवारी 2022 रोजी शासनाने पत्र काढले आहे. तसा प्रस्ताव अधिसुचनेचे प्रारूप तात्काळ सादर करण्याचे सादर करण्याचे पत्र काढले आहे. यामुळे राज्यामध्ये दलीतांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे. एवढ्या भीषण  परिस्थितीमध्ये शासनाने वरिष्ठ वर्गाचे अधिकार कनिष्ठ अधिकार्‍यांना देण्याची बाब अत्यंत गंभीर आहे. गृह विभागच्या या पत्रामुळे दलीत समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजाला तारणारा संरक्षण देणारा कायदा कमकुवत होत आहे अशी भावना समाजात निर्माण होत आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा तपास कनिष्ठ अधिकार्‍याकडे गेल्यावर कायद्याची भिती उरणार नाही व अत्याचारात वाढ होईल अशी भिती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. सरकारने कायदा तपासण्याऐवजी कठोर पावले उचलावीत व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला व समाजाला संरक्षण द्यावे कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते गणेश चांदोडे, नंदा पवार, विशाल साबळे, प्रेम जोगदंड यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.