वैशाली दाभाडे यांना उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल : निर्माता सुनील अहिरे ,दिग्दर्शक शंकर यशोद यांचा ‘अ…’ लघुपट ठरला सर्वोत्कृष्ट

जालना ,२२ जानेवारी /प्रतिनिधी :- जळगाव येथील डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे आणि अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल – 2022 मध्ये अभिनेत्री वैशाली दाभाडे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अ…’ या लघु चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट हा पुरस्कार मिळाला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून वैशाली दाभाडे यांना पुरस्कार मिळाला आहे.

Displaying 3.jpg

भोकरदन ( जि. जालना ) तालुक्यातील लतीफपूर या छोट्याशा गावातून पुढे आलेल्या वैशालीने मराठी – हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतः ची ओळख निर्माण केली आहे. या यशाबद्दल जालना जिल्ह्यातील चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
   आपल्या समाज व्यवस्थेमध्ये विशेषतः ग्रामीण भागात अजूनही स्त्री-पुरुष समानता रुजलेली नाही. आपल्या व्यवस्थेत स्त्री – पुरुष समानतेबद्दल बोलले जाते, लिहिले जाते, नव्हे नव्हे तर आपल्या शिक्षण व्या व्यवस्थेतही स्त्री – पुरुष समानतेचे धडे दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात सामाजिक चित्र अगदीच उलटे असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. स्त्रियांना आजही पुरुषांच्या तुलनेने दुय्यमपणाची वागणूक दिली जाते. स्त्रियांना अशी दुय्यम वागणूक त्यांच्या कुटुंबापासून ते सामाजिक स्तरावर देखील दिली जाते. दिग्दर्शक शंकर यशोद यांची ‘अ…’ या लघुपटाची कथा समाज व्यवस्थेतील याच स्त्री – पुरुष असमानतेवर बोट ठेवणारी आहे. एका खेड्यातील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील ‘चिमणी’ च्या बालमनावर समाजातील स्त्री – पुरुष असमानता कशा पद्धतीने आघात नकरते, याचे उत्कृष्टपणे चित्रण ‘अ…’या लघुपटात केलेले आहे. या लघुपटात अभिनेत्री वैशाली दाभाडे यांची सरला या नावाची मुख्य भूमिका असून त्यांची ही भूमिका उत्कृष्ट ठरली आहे.

Displaying 1.jpg


या लघुपटात अभिनेत्री वैशाली दाभाडेसह सचिन बागुल, प्रसन्ना बोरसे,भीमराव खेत्रे,शैलेश अहिरे,सुनंदा कोचुरे, दिलीप शिरसाट यांच्या भूमिका आहेत.

अभिनयातील वाटचाल …

वैशाली दाभाडेने आजपर्यंत अनेक मराठी, हिंदी चित्रपटात भूमिका साकारलेल्या आहेत. ‘लक्ष्मी तुझ्याविना’, ‘वात्सल्य’, ‘बाबो’, ‘हलाल’
‘धग’ या मराठी चित्रपटात वैशालीने भूमिका केल्या.’धग’ या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.अभिनेता कैलास वाघमारे ची मुख्य भूमिका असलेल्या ‘मनातल्या उन्हात’ मध्ये देखील वैशालीची भूमिका आहे. याशिवाय अभिनेता अजय देवगण यांच्या अत्यंत गाजलेल्या ‘सिंघम रिटर्न्स’ या बॉलिवूड चित्रपटात, सोहा अलिखानच्या ‘३१ ऑक्टोबर’ या चित्रपटात देखील वैशालीला संधी मिळाली. याशिवाय ‘रिस्पेक्ट’,आणि ‘अ’ यासारख्या लोकप्रिय ठरलेल्या लघुपटातही वैशालीने अभिनयाचा कस लावला.’अ’ या लघुपटातील ‘सरला’ या भूमिकेसाठी वैशालीच्या बेस्ट ऍक्टरेस’ चा पुरस्कार देखील मिळाला आहे. एकूणच ग्रामीण भागातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील वैशाली दाभाडेने चित्रपट क्षेत्रात आपल्या विविधांगी अभिनयाचा ठसा उमटवला असून जालना जिल्ह्याचा लौकिक वाढवला आहे.