तिर्थपुरी शहराला विकासाचे मॉडेल करणार – जालना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार

जालना ,२१ जानेवारी /प्रतिनिधी :-नागरी सुविधा उपलब्ध करून देतानाच विकासाची भरीव कामे हाती घेऊन तिर्थपुरी शहराला विकासाचे मॉडेल शहर अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे जालना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व पॅनल प्रमुख महेंद्र पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

घनसावंगी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या तीर्थपुरी नगरपंचायतीच्या प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले . या निवडणुकीत राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालक मंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा घनसावंगी नगरपंचायत  निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष भाजप पॅनलचे प्रमुख महेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत तीर्थपुरी नगरपंचायतवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा पॅनल प्रमुख महेंद्र पवार म्हणाले की, तीर्थपुरी ग्रामपंचायत ताब्यात असताना ग्रामपंचायतचे सरपंच शैलेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली तीर्थपुरी शहराचा मोठ्या प्रमाणात कायापालट करण्यात आला आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करून तीर्थपुरी शहरात रस्ते, भूमिगत गटार योजना, लाईट, स्वच्छता, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते इत्यादी विकासाची कामे मार्गी लावून तीर्थपुरी शहराचा संपूर्ण कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मागील दहा ते पंधरा वर्षात करण्यात आलेला आहे. याशिवाय तीर्थपुरी येथे ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध खेळांचा सराव करता यावा व  खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत स्थान मिळवता यावे यासाठी  क्रीडा संकुल उभारण्यात आले . 

तीर्थपुरी शहरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाची भरीव कामे मागील काळात करण्यात आली आहे. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी तीर्थपुरी येथील ग्रामस्थांची आग्रही मागणी लक्षात घेऊन तीर्थपुरी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये केले . नगरपंचायतीची घोषणा झाल्यानंतर प्रथमच होत असलेल्या या सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. नगरपंचायतीची घोषणा झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. परंतु तीर्थपुरी नगरपंचायतीची घोषणा होण्यापूर्वी या जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व आपल्याकडे असल्यामुळे तसेच आपले बंधू शैलेंद्र पवार हे तीर्थपुरी ग्रामपंचायतचे सरपंच असताना तीर्थपुरी शहरात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपलाच विजय होईल असा आत्मविश्वास होता. नगरपंचायतीच्या प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विकासाचा मुद्दा घेऊन आपण जनतेसमोर मतदान मागण्यासाठी गेलो असताना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या निवडणुकीचे निकाल दोन दिवसापूर्वीच जाहीर झाले असून या निवडणुकीत तीर्थपुरी शहरवासीयांनी आमच्या पॅनलमधील उमेदवारांवर पूर्ण विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष भाजपला सत्तेत बसण्याची संधी देत ग्रामपंचायतच्या माध्यमातून मागील काळात केलेल्या भरीव विकासकामांची पावती दिली आहे असे  पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

आगामी काळात तीर्थपुरी नगरपंचायतच्या माध्यमातून शहरात राज्य शासन, केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच अन्य योजनांच्या माध्यमातून विकास कामांचा आराखडा तयार करून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरात सर्वच भागात भूमिगत गटार योजना, अंतर्गत रस्ते, प्रमुख रस्ते, लाईट, स्वच्छता, पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक शौचालय, इत्यादी विकासाची कामे हाती घेऊन तीर्थपुरी शहरातील नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देतानाच शहराला विकासाचे मॉडेल म्हणून नावलौकिक मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले.