मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना श्रद्धांजली

मुंबई :- पत्रकारितेच्या क्षेत्रात  मुल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

No photo description available.

इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दिवंगत रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढ्यांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरित्या बजावली. त्यामुळे मराठी पत्रकारितेच्या मुल्यांचे जतन आणि जगभरातील आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. नवनवीन आशय संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी उभी राहिली, असेही  मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

No photo description available.

दिनकर रायकर साक्षेपी, संयत पत्रकार, संपादक – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

दिनकर रायकर साक्षेपी, संयत पत्रकार, संपादक – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 ज्येष्ठ संपादक व पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

दिनकर रायकर हे अभ्यासू, साक्षेपी व संयत पत्रकार व संपादक होते. पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक वृत्तपत्रांमध्ये काम करताना रायकर यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला. संपादक म्हणून वाचकांचे प्रबोधन करताना त्यांनी टोकाच्या भूमिका घेतल्या नाही. राज्यातील अनेक पत्रकारांच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या माध्यम जगतातील एका व्यासंगी पत्रकार – संपादकाला तसेच समाजाशी बांधिलकी जपणाऱ्या मनमिळावू व्यक्तीला आपण मुकलो आहोत, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन ही राज्याच्या पत्रकारिता, साहित्य क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

 “ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. दिनकर रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती.

पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. राज्याच्या विकासप्रक्रियेत महत्वाचं योगदान दिलं. युवा पत्रकारांना मार्गदर्शन केलं. प्रोत्साहन दिलं. पत्रकारितेत तरुणांच्या पिढ्या घडवल्या. त्यांचं निधन ही राज्याच्या पत्रकारिता, साहित्य क्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

ज्येष्ठ संपादक दिनकर रायकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची हानी – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

लोकमत समूहाचे माजी समूह संपादक व समन्वयक संपादक दिनकर रायकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

श्री.देसाई आपल्या शोक संदेशात म्हणतात, दिनकर रायकर यांनी इंडियन एक्सप्रेस समूहात दीर्घकाळ पत्रकारिता केली. तसेच लोकसत्ता दैनिकातही त्यांनी काम केले. गेल्या ५० वर्षांतील महाराष्ट्रातील अनेक घडामोडींचा त्यांचा सखोल अभ्यास होता. अनेक राजकीय घटनांचे ते साक्षीदार होते. मराठी पत्रकारितेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. रायकर यांच्याशी आपले अनेक वर्षांपासून व्यक्तीगत तसेच जिव्हाळ्याचे संबंध होते, अशा शब्दांत मंत्री सुभाष देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली.