सट्टा प्रकरणात पोलिसांनी नाशिकच्‍या तिघांना घातल्या बेड्या

औरंगाबाद,१९ जानेवारी / प्रतिनिधी :- भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० क्रिकेट मॅचवर फोन व्दारे पैसे लावुन, सट्टा खेळल्याप्रकरणात सायबर पोलिसांनी नाशिकच्‍या तिघांना तब्बल दोन महिन्‍यानंतर बेड्या ठोकल्या. तिघा आरोपींना २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस.डी. कुर्हेकर यांनी बुधवारी दि.१९ दिले. सद्दाम झुल्लफेकार शेख, अमित मदन बुर्हाडे आणि अमोल कापडनीस (सर्व रा. एन-९ सी, तुळजा भवानी चौक, शिवाजी चौक जुना सिडको नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत.

गुन्‍ह्यात यापूर्वी तबरेझ खान, वसीम खान आणि आसेफ शेख या तिघांना अटक करुन त्‍यांच्‍याताब्यातुन पाच मोबाइल, दोन दुचाकी आणि पाच हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा सुमारे एक लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तिघा आरोपींची पोलिस कोठडीनंतर न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे.

सायबर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन त्‍यांनी हर्सुल येथील मथुरा लॉन शेजारील मोकळ्या जागेवर छापा टाकून भारत विरुद्ध न्युजीलंड टी-२० क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणार्या वरील तिघांना अटक केली. गुन्‍ह्यात सद्दाम शेख वापरत असलेला मोबाइल हा मध्‍यप्रदेशातील दयाल सिंग याचे नावे रजिस्‍टर आहे. तर पे फोन खाते अमीत बुर्हाडे याचे नावे असल्याची माहिती आरोपी तबरेज खान याने दिली. तर सद्दाम वापरत असलेला आणखी एका मोबाइलचे पे फोन अमोल कापडनीस याच्‍या नावे असल्याचे पोलिसांच्‍या तपासात निष्‍पन्‍न झाले आहे.

नाशिकच्‍या तिघा आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, आरोपींनी औरंगाबाद व नाशिक येथील किती लोकांकडून पैसे घेूवन सट्टा लावला. गुन्‍ह्यात वापरलेली वेब साईट कोठे व कोणी तयार केली, या वेबसाईट व्‍यतिरिक्त आरोपींनी इतर वेब साईटचा वापर केला काय. आरोपींचे आणखी किती साथीदार आहेत. गुन्‍ह्यात वापरलेले खाते हे व्‍यापारी आस्‍थापनेचे करंट खाते असून त्‍याचा कोणत्‍या कारणासाठी व कोणा-कोणाकडून त्‍याचा वापर होत होता याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सरकारी वकीलांनी न्‍यायालयाकडे केली.