नाना पटोले यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा- वैजापूर शहर भाजपची पोलिस ठाण्यासमोर निदर्शने

जालना ,१९ जानेवारी /प्रतिनिधी :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ  वैजापूर शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पोलिस ठाण्यासमोर निदर्शने करून नाना पटोले यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शहरातील भाजप कार्यकर्त्यानी आज सकाळी वैजापूर पोलीस ठाण्यासमोर निदर्शने व घोषणाबाजी करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यासंदर्भात पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त व आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संतापजनक प्रतिक्रिया उमटत असून सामाजिक सलोख्यास धोका निर्माण झाला आहे. नाना पटोले यांनी केलेले आक्षेपार्ह व एकेरी वक्तव्य हे भारताच्या संवैधानिक पदाबाबत केलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचे दिसून येते. नाना पटोले यांनी निवडणूक प्रचार सभेत केलेल्या या वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे त्यामुळे नाना पटोले यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत यांच्यासह नगरसेवक दशरथ बनकर, सूर्यकांत सोमवंशी, शैलेश पोंदे, झाकीर कुरेशी, गिरीश चापानेरकर, किरण व्यवहारे,प्रदीप चव्हाण,योगेश फुलारे,अमोल गोरक्ष,गौरव दोडे,निलेश पारख,संदीप पवार,नदीम शेख, दीपक त्रिभुवन, कृष्णा क्षिरसागर, शुभम निकम, रौनक पंजाबी, अर्जुन राजपूत,देविदास त्रिभुवन,धीरज बोथरा,गुलाब राजपूत आदी उपस्थित होते.