पटोले -मोदी वाद पोलिस ठाण्यात ,जालन्यात भाजपा आणि काँग्रेसची तक्रार

जालना ,१८ जानेवारी / प्रतिनिधी :-पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपा यांच्यातील वाद येथील कदीम पोलिस ठाण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ कापा आणि 1 लाख रुपये मिळवा अशी घोषणा भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केली आहे.आ. नानाभाऊ पटोले यांच्या विषयी चिथावनीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांच्या विरूध्द तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी फिर्यादीत केली आहे.

नाना पटोले यांची जीभ कापा आणि 1 लाख रुपये मिळवा-भाजपा
Displaying IMG-20220118-WA0046.jpg

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ कापा आणि 1 लाख रुपये मिळवा अशी घोषणा भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केली आहे.

पंतप्रधान  मोदी यांच्या विरोधात  पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाने तक्रार दाखल केली  त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अ​से या तक्रारीत म्हटलं आहे.

महाराष्ट्रात नारायण राणे यांच्यासाठी वेगळा कायदा आणि नाना पटोले यांच्या साठी वेगळा कायदा आहे का असा सवाल  भाजपा युवा मोर्चाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.यावेळी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आल्या भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा उपाध्यक्ष संदीपभाई हिवराळे, गोविंद ढेंबरे पाटील., जिल्हा चिटणीस सचिन गाडे,  तालुकाध्यक्ष अनिरुद्ध जाधव, तालुका उपाध्यक्ष करण निकाळजे, गणेश देशमुख  उपस्थित होते.

सुजीत जोगस यांच्या विरूध्द तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावी-जालना शहर काँग्रेस

जालना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या विषयी चिथावनीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांच्या विरूध्द तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी कदीम जालना पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना दिलेल्या फिर्यादीत केली आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात शेख महेमूद यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या संदर्भात आज 17 जानेवारी मंगळवार रोजी एका वृत्तवाहिनीला (पोर्टल) दिलेल्या प्रतिक्रीये दरम्यान  भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी भडकाऊ व चितावणीखोर वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांची कुणीही जीभ कापा व त्यांच्याकडून 1 लाख रूपये बक्षीस मिळवा असे दखलपात्र व अपराध करणारे वक्तव्य करून ते सोशल माध्यमात सर्वत्र प्रसारीत केले. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त केलेल्या गंभीर गुन्ह्याची तात्काळ दखल घेवून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. तसेच उपविभागीय अधिकारी जालना यांच्यामार्फत मुंबई पोलीस अधिनियम अन्वये हद्दपारीची कार्यवाही करावी अशी मागणीही शेख महेमूद यांनी या फिर्यादीत केली आहे.